नेवासा | नगर सह्याद्री
अहिल्यानगर जिल्ह्यातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. नेवासा शहरातील कालिका फर्निचर दुकानाला भीषण आग लागून एकाच कुटूंबातील पाच जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी (दि. १८) मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
एकाच कुटूंबातील पती – पत्नी आजी आणि त्यांच्या दोन बालकांचा या दुर्दैवी घटनेत अंत झाल्यामुळे नेवासा तालुयावर प्रचंड शोककळा पसरली आहे. मयूर अरुण रासने (वय ३६वर्षे), पायल मयूर रासने (वय ३० वर्षे), अंश मयूर रासने (वय ११ वर्षे), चैतन्य मयूर रासने (वय ६ वर्षे), आणि त्यांची वयोवृद्ध आजी सिंधुताई चंद्रकांत रासने (वय ८५ वर्षे) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, नेवासा शहरातील अहिल्यानगर प्रभागात कालिका फर्निचर या दुकानाला अचानक आग लागली. या आगीमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. तर अरुण रासने आणि त्यांच्या पत्नी या मालेगांव येथे नातेवाईकांकडे गेल्यामुळे ते दोघे सुदैवाने बचावले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच नेवासा नगरपंचायत आणि लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या आगीत फर्निचर आणि इलेट्रॉनिक वस्तूंनी मोठा पेट घेतल्यामुळे लवकर आग आटोयात न आल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान या घटनेने अहिल्यानगर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.