अहमदनगर / नगर सहयाद्री : आधी ठिकाण ठरवायचे, त्यानंतर बारा ते तेरा जणांच्या टोळीने मिळून दरोडा घालायचा, अशी गुन्हा करण्याची पद्धत असलेल्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. पाथर्डी तालुक्यातील टाकळी मानूर येथील दरोड्याच्या गुन्ह्याची उकल झाली आहे. गुन्ह्यातील तेरा आरोपींपैकी सहा जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
आजिनाथ भागीनाथ पवार (वय २६, रा. आर्वी, ता. शिरुर कासार, जि. बीड), गणेश रामनाथ पवार (वय २५, रा. ब्रम्हगव्हाण, ता. पैठण, जि.छत्रपती संभाजीनगर), विनोद बबन बर्डे (वय २७, रा. वारणी, ता. शिरुर कासार, जि.बीड), अविनाश काशिनाथ मेहेत्रे (वय २८, रा. कुळधरण रोड, कर्जत, ता. कर्जत), अमोल सुभाष मंजुळे (वय २३, रा. वडगाव पिंपरी, ता. कर्जत), तुकाराम धोंडीबा पवार (रा.पाथर्डी, जि.अहमदनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
संदीप बबन बर्डे, पप्पु उर्फ राहुल दिलीप येवले, भारत फुलमाळी (तिघे रा.शिरुर कासार, जि.बीड), बाबासाहेब भवर (रा. वडगाव, ता. पाथर्डी), विकास उर्फ हरी पोपट सुळ, विशाल जगन्नाथ मंजुळे, अक्षय सुरेश पवार (तिघे रा. वडगाव तनपुरा, ता. कर्जत) अशी फरार आरोपींची नावे आहेत. टाकळी मानूर येथील अंबिका नगरात राहणाऱ्या बाबासाहेब उत्तम ढाकणे (वय ७४) यांच्या घरावर दरोडा पडला होता. दरोडेखोरांनी सत्तुरचा धाक दाखवून घरातील ६६ हजारांचे दानिगे, रोख व मोबाईल चोरुन नेले होते.
गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने हाती घेतल्यानंतर त्यांना माहिती मिळाली, की आरोपी संदीप बर्डे व त्याच्या साथीदारांनी हा गुन्हा केला. आरोपी पाथर्डी येथून मोहटादेवी रस्त्याने जाणार असल्याचे समजताच एलसीबीच्या तीन पथकांनी कारेगाव फाटा (पाथर्डी) येथे सापळा रचला होता.
संशयित पिकअप वाहन दिसताच पोलिसांनी त्यांना अडविले. यावेळी तीन जण पळून गेले व पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी दरोड्याचा कट रचणारा आरोपी तुकाराम पवार याला अटक केली.