नवी दिल्ली / वृत्तसंस्था –
गुजरात राज्यातून आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. गुजरातच्या बनासकांठामध्ये एका फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. या भीषण स्फोटात १७ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. कारखान्यात असलेल्या बॉयलरचा स्फोट झाला, त्यामुळे ही दुर्घटना घडली. स्फोट झाला तेव्हा कारखान्यात ३० कामगार काम करत होते. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान पोहोचले असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
बनासकांठातील डीसा भागात असलेल्या फटाका कारखान्यात सकाळी नऊच्या सुमारास स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. स्फोटाचा आवाज ऐकताच आसपासचे लोक कारखान्याजवळ पोहोचले. तेव्हा कारखान्यातून आगीच्या ज्वाळा बाहेर पडत होत्या. याची माहिती लगेच एसडीआरएफ आणि अग्निशमन दलाला देण्यात आली. डीसा ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटामुळे कारखान्याचं मोठं नुकसान झालं आहे. भिंती, छप्पर कोसळलं असून ढिगाऱ्याखाली काही कामगार अडकले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तर स्फोटाच्या तपासाचे आदेश देण्यात आलेले आहेत.
दरम्यान, दीपक ट्रेडर्स नावाच्या कारखान्यात हा भीषण स्फोट झाला आहे. या ठिकाणी फटाके तयार केले जातात. स्फोटानंतर कारखान्याचा मालक फरार झाला आहे. जिल्हाधिकारी माहिर पटेल घटनास्थळी पोहोचले आहेत. या कारखान्याला फटाके तयार करण्याचा परवाना मिळाला होता की नाही? याची चौकशी सध्या केली जात आहे.