निघोज । नगर सहयाद्री
निघोज भुकन वस्ती (ता. पारनेर) येथे मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत एक गोठा जळून खाक झाला असून बैलगाडा शर्यतीतील काही बैल गंभीर जखमी झाले आहेत. या आगीत गोठ्याचे सुमारे १५ ते २० लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
आग भुकन वस्तीवरील निलेश भगवान भुकन यांच्या घराशेजारील गायी गोठ्यात लागली. मध्यरात्री गोठ्यातून बैलांच्या मोठ्या आवाजाने निलेश भुकन यांची झोपमोड झाली आणि त्यांनी तातडीने गोठ्याकडे धाव घेतली. त्यांनी जीवाची पर्वा न करता आगीतून बैलांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला. यावेळी जळालेल्या छताचा काही भाग त्यांच्या डोक्यावर कोसळून ते जखमी झाले. तरीही त्यांनी सर्व जनावरे बाहेर काढण्यात यश मिळवले.
या आगीत बैलगाडा शर्यतीतील महत्त्वाचे बैल गंभीर भाजले असून त्यांना वैद्यकीय उपचार देण्यात येत आहेत. गुरुवारी सकाळी ग्रामसेवक संजय पवार, कामगार तलाठी दत्तात्रय काळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तहसीलदार व पंचायत समिती यांच्याकडे नुकसानभरपाईसाठी अहवाल पाठवण्यात आला आहे.
यावेळी यावेळी उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे, शिवबा संघटना संस्थापक अध्यक्ष अनिल शेटे, पैलवान सुभाष वराळ, पत्रकार आनंदा भुकन, ग्रामपंचायत सदस्य सुधामती कवाद, माजी सदस्य भिमराव लामखडे, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त विठ्ठलराव कवाद, सल्लागार रुपेश ढवण, निघोज सोसायटीचे माजी संचालक शांताराम कवाद यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांनी तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली.
भुकन वस्तीवरील शेजारी वस्ती करणाऱ्या काही बाहेरील लोकांनी हा गोठा जाळण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप गोठा मालक निलेश भगवान भुकन यांनी केला आहे. हा गोठा जाळताना आपण या लोकांना पाहिले असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी भुकन यांनी केली आहे.
यावेळी सहाय्यक फौजदार शिवाजु कडूस, प्रशांत दिनकर, प्रकाश बोबडे, गणेश डोंगरे आदिंनी पाहाणी केली तसेच आरोपींना लवकर अटक करण्यात येईल अशी ग्वाही दिली. अनिकेत भुकन, शरद भुकन, सागर अनंत, दत्तात्रय भुकन आदिंनी तसेच उपस्थित ग्रामस्थांनी यावेळी पोलीसांकडे आरोपींंना लवकरच अटक करण्याची मागणी केली आहे.