जामखेड । नगर सहयाद्री:-
कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील निवडणूकीत मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत उत्कंठावर्धक ठरलेल्या लढतीत आ. रोहित पवार यांनी अवघ्या 1243 मतांनी विजय मिळवला. विधानसभा निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाले लागले, अनेक दिग्गज नेते पराभूत झाले. मात्र, या लाटेतही काही युवक चेहरे विजयी झाले आहेत. त्यामध्ये, आमदार रोहित पवार हे कर्जत जामखेड मतदारसंघातून विजयी झाले.
कर्जत जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवार यांच्यासाठी गावागावात प्रचार झाला, अनेकांनी उत्स्फूर्तपणे प्रचारीची भूमिका बजावली, तर काहींनी रोहित पवार विजयी होण्यासाठी काहींनी नवसही बोलले होते. आता, स्वत: आमदार रोहीत पवार हे नवस फेडण्यासाठी जात आहेत.
तिखी गावातील नंदा श्रीरंग कोरडे या ताईंनी माझ्या विजयासाठी ग्रामदैवत ओढ्यातील बाबाला नारळाचं तोरण बांधण्याचं साकडं घातलं होतं. त्यानुसार ग्रामस्थांसोबत वाजत-गाजत तोरण नेऊन बाबाला अर्पण केलं आणि आशीर्वाद घेतले, अशी पोस्ट रोहित पवार यांनी केली आहे.
माझ्यासाठी प्रार्थना करणाऱ्या माझ्या जीवाभावाच्या सर्वांना सुखी ठेवण्यासाठी जे-जे करण्याची गरज आहे ते ते करण्याची शक्ती ईश्वराने द्यावी, हीच प्रार्थना देवाला करत असल्याचंही ते म्हणाले. निवडणुकीतील विजयासाठी थेरवडी येथील मधुकर कांबळे यांनी ग्रामदैवत असलेल्या मारुतीला अकरा नारळाचं तोरण बांधण्याचं साकडं घातलं होतं.
त्यांचा हा धावा मारुतीरायाने ऐकला आणि त्यांनी बोलल्याप्रमाणे अखेर माझ्या उपस्थितीत अकरा नारळाचं तोरण अर्पण केलं आहे. कोरेगावमधील (ता. कर्जत) गोरख पिसे यांनी रोहित पवार यांच्या विजयासाठी ग्रामदैवत श्री कोरेश्वर महाराजांना साकडं घातलं होतं. त्यांची इच्छापूर्ती झाल्याने ग्रामस्थांसोबत कोरेश्वराचं दर्शन घेऊन रोहित पवार यांनी पेढे वाटले आहे.