सुपा । नगर सहयाद्री:-
पारनेर तालुक्यातील सुपा शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर अधिकच वाढला आहे. गत वीस दिवसांत तब्बल तीन बिबटे वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाले असून, अद्यापही आणखी एक बिबट्या व दोन पिल्ले परिसरात फिरत असल्याचे ग्रामस्थांनी पाहिल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सुपा परिसरात भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरात सलग बिबट्यांचे दर्शन व हल्ल्यांमुळे रात्रीचे फिरणे, शेतात जाणे तसेच पाळीव प्राण्यांना सोडणे धोकादायक बनले आहे. ग्रामस्थांनी बस स्थानकाच्या पाठीमागे, मज्जिद परिसरात आणि मेन चौकात बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याचे सांगितले असून, एक बिबट्या आणि दोन पिल्ले अजूनही सुपा परिसरात फिरत असल्याची शक्यता वनविभागानेही नाकारलेली नाही. वनविभागाने गावकऱ्यांना सतर्क राहण्याचे, रात्री घराबाहेर न पडण्याचे व पाळीव प्राण्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे आवाहन केले आहे.
सुपा गावच्या सरपंच मनिषा रोकडे, उद्योजक योगेश रोकडे, माजी उपसरपंच सागर मैड, दत्तानाना पवार यांच्यासह वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असून, अधिक पिंजरे लावण्याची मागणी केली आहे. तीन बिबटे जेरबंद झाले असले तरी गावकरी अजूनही धास्तावलेले असून, पूर्णतः सुरक्षिततेसाठी वनविभागाच्या पुढील हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पहिला बिबट्या ६ सप्टेंबरला जेरबंद
सुपा शहराजवळील जिजाबा गवळी वस्ती येथे १७ दिवसांपूर्वी लावलेल्या पिंजऱ्यात शनिवार, ६ सप्टेंबर रोजी पहाटे पहिला बिबट्या जेरबंद झाला. मात्र त्याच परिसरात दुसऱ्या बिबट्याचेही दर्शन झाल्याने वनविभागाने जांभूळ ओढा आणि शितारा बिल्डिंगच्या पाठीमागे दोन पिंजरे लावले होते.
दुसरा बिबट्या १६ सप्टेंबरला जेरबंद
१६ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजता, शितारा बिल्डिंगच्या पाठीमागील पिंजऱ्यात दुसरा बिबट्या अलगद अडकला. ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास टाकला, मात्र काही तासांतच डोंगरवाडी परिसरात पुन्हा बिबट्याचे दर्शन झाल्याने चिंतेत भर पडली होती.
तिसरा बिबट्या २३ सप्टेंबर जेरबंद
डोंगरवाडी येथे एका शेळीवर बिबट्याने हल्ला केल्यानंतर, संबंधित शेतात पिंजरा लावण्यात आला होता. मंगळवार, २३ सप्टेंबर रोजी पहाटे ५:३० वाजता तिसरा बिबट्या त्या पिंजऱ्यात अडकला आहे.