बीड / नगर सह्याद्री –
मस्साजोगचे सरपंच देशमुख हत्या प्रकरणाचा उलगडा हळूहळू होत आहे. सीआयडी एसआयटीने दाखल केलेल्या दोषारोपपत्रातून अनेक धागे दोरे सापडत आहेत. आरोपी सुदर्शन घुलेने संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या केली असल्याचं कबुल केलं. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
या प्रकरणात आता ट्विस्ट आला आहे. संतोष देशमुखांनी सुदर्शन घुलेला मारहाण सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून केली असल्याचे आरोपींनी आपल्या जबाबात म्हटलं आहे. त्यामुळे सुग्रीव कराड कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी जयराम चाटे आणि महेश केदार यांचा जबाब नोंदवण्यात आला. त्यांनी दिलेल्या जबाबातून एक नवं नाव समोर आलं आहे. सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुख आणि काही ग्रामस्थांनी सुदर्शन घुलेला मारहाण केली असल्याचे आरोपींनी आपल्या जबाबात म्हटलं आहे.
यानंतर ‘सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यांचा अपमान झाला आहे, याचा बदला घ्यायलाच पाहिजे’, असं फरार आरोपी कृष्णा आंधळेने चाटे आणि केदारला म्हटलं होतं, असं जबाबात आरोपींनी माहिती दिली. बदला घेण्यासाठी देशमुख यांना मारहाण करण्यात आल्याचंही चाटे आणि केदारने सांगितलं आहे. सुग्रीव कराड नामक हा व्यक्ती केजमधील रहिवासी आहे. जयराम चाटे आणि महेश केदार यांनी पोलिसांसमोर दिलेल्या जबाबामुळे. सुग्रीव कराडची देशमुख हत्या प्रकरणातील भूमिका समोर आली आहे.