अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
घोडेगाव (ता. नेवासा) येथे प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चार आरोपींना अटक केली असून तब्बल ५ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बुधवार दि. १६ जुलै रोजी रात्री १० वाजता फिर्यादी अरुण गंगावणे (वय ४८, रा. महालक्ष्मी हिवरे) हे वाहनाची वाट पाहत असताना काही अज्ञात व्यक्तींनी त्यांना प्रवासी कारमध्ये बसवले. त्यांनंतर चाकूचा धाक दाखवत रोख राक्केमसह लुटण्यात आले. याबाबत सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील जबरी चोरीसारख्या गंभीर गुन्ह्यांचा छडा लावण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना दिले होते. त्यानंतर तपासासाठी विशेष पथक तयार करण्यात आले. पथकात पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर शिंदे, संदीप पवार, गणेश लोंढे, गणेश धोत्रे, शाहीद शेख, संदीप दरंदले, फुरकान शेख, अशोक लिपणे, प्रमोद जाधव, प्रशांत राठोड, मयुर गायकवाड यांचा समावेश होता.
पथकाने गुन्ह्याचा तपास गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सुरू केला असता, सदर गुन्हा विश्वास रमेश पंडीत (रा. भावी निमगाव, ता. शेवगाव) याने आपल्या साथीदारांसह केल्याचे निष्पन्न झाले. या गुन्ह्यासाठी (एमएच-१२-एनएक्स-२४०६) या क्रमांकाची कार वापरण्यात आलीया असून आरोपी हे वांबोरी येथून अहिल्यानगरकडे येणार असल्याची माहिती मिळाली.
पथकाने सापळा रचुन संबंधित कारसह विश्वास रमेश पंडीत (वय २८), रोहन बाळासाहेब मोरे (वय २१), संदेश अनिल पेटारे (वय २१), सोपान पांडुरंग वाबळे (वय २७), (सर्व रा. भावी निमगाव, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली असता गुन्ह्यांची कबुली दिली. आरोपींकडून कारसह ५ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास सोनई पोलीस करीत आहेत.