अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
शहरात बंदी असलेल्या सुगंधी गुटख्याची तस्करी करणाऱ्या एका आरोपीस कोतवाली पोलिसांनी अटक करत सुमारे ३ लाख १३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दिपक पोपटराव लोखंडे असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. त्याच्याकडून गुटख्याने भरलेली कार, मोबाईल फोन जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुरज दिलीप कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे हातमपुरा चौकात गुरुवारी सापळा रचण्यात आला. एमएच १६ एबी ३८५१ क्रमांकाची अल्टो कार थांबवून तपासणी केली असता, १ लाख ५८ हजाराहून अधिक किमतीचा विमल गुटखा व व्ही १ तंबाखू आढळली. प्राथमिक चौकशीत, हा गुटखा नविद तांबोळी उर्फ नविद बाबा याला विकण्यासाठी नेत असल्याची माहिती आरोपीने पोलिसांना दिली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात करत आहेत.
महिलेला मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल
घराच्या खरेदी-विक्री व्यवहारात पतीने जास्तीचे पैसे घेतल्याच्या संशयावरून एका महिलेला घरात घुसून मारहाण करत तिचा विनयभंग केल्याची घटना केडगाव परिसरात घडली. याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून वैशाली विशाल निमसे आणि प्रमोद सुरेकर यांच्याविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी महिलेचे पती देविदास यांनी दोन महिन्यांपूर्वी आरोपी वैशाली निमसे यांच्या घराचा व्यवहार करून दिला होता. मात्र, या व्यवहारात देविदास यांनी अधिक पैसे घेतल्याचा संशय वैशालीला होता. यातून ती सतत देविदास यांना फोन करून पैशांची मागणी करत धमकी देत होती. १ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास फिर्यादी महिला घरी एकटी असताना वैशाली निमसे व प्रमोद सुरेकर त्यांच्या घरी आले. त्यांनी महिलेला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. विरोध करताच वैशालीने मारहाण केली. प्रमोद सुरेकर याने हात धरून ओढत विनयभंग केला व पतीसह जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
वाहतूक व्यावसायिकाच्या विश्वासाला तडा
वाहतूक व्यावसायिकाच्या विश्वासाला तडा देत एका ट्रक चालकाने तब्बल २ लाख ६० हजार रुपये किमतीच्या ५१ बॅटऱ्या लंपास करून पलायन केल्याची घटना केडगाव परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी ट्रक चालक प्रविण ओमपाल याच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरियाणा येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक जनरैल सिंह अमरजित सिंह (वय ३६) यांच्या मालकीचा ट्रक (क्र. एच.पी. ७२ डी ५९६९) चालक प्रविण ओमपाल (रा. मंसुरपुर, उत्तर प्रदेश) हा चालवत होता. दि. २३ सप्टेंबर रोजी कलकत्ता येथून एक्साईड कंपनीच्या १३३२ बॅटऱ्या भरून तो पुण्याकडे निघाला होता. दि. २८ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत चालक जनरैल सिंह यांच्या संपर्कात होता आणि आपण केडगाव (अहिल्यानगर) येथे असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर मात्र त्याचा मोबाईल बंद झाला. मालक जनरैल सिंह यांना संशय आल्याने त्यांनी गाडीच्या जीपीएस लोकेशनवरून शोध घेतला असता, ट्रक केडगाव येथील नील हॉटेलजवळ बेवारस स्थितीत आढळून आला. त्यांच्या नातेवाईकांनी ट्रक पुण्याला पोहोचवल्यावर तपासणी केली असता, त्यातील २ लाख ६० हजार ५७६ रुपयांच्या ५१ बॅटऱ्या गायब असल्याचे उघड झाले. चालक प्रविण ओमपाल यानेच या बॅटऱ्या चोरून अपहार केल्याची फिर्याद जनरैल सिंह यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विश्वास गाजरे करीत आहेत.
केडगावात मध्यरात्री फिरणारे दोघे गजाआड
केडगाव परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास संशयास्पदरित्या फिरणाऱ्या दोन तरुणांना कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून सुमारे ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये गॅस वेल्डिंगचे साहित्य व विनानंबरची सुझुकी अॅक्सेस मोपेड यांचा समावेश आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अनिकेत शंकर वाकळे (वय २२, रा. टिळक रोड) आणि सोमनाथ राजू केदारे (वय २१, रा. बोल्हेगाव) अशी आहेत. गुरुवार दि. २ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी अर्जुन फुंदे व होमगार्ड मंदार सटाणकर हे केडगावमधील विश्वयनराजे नगर कमानीजवळ गस्त घालत असताना, एका पांढऱ्या रंगाच्या मोपेडवरून येणारे दोघेजण त्यांना संशयास्पद वाटले. पोलिसांनी त्यांना थांबवून झडती घेतली असता, तीन गोण्यांमध्ये वेल्डिंग साहित्य, पितळी सामान व नटबोल्ट आढळून आले. चौकशीत उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर पोलिसांनी रागाचा पारा दाखवताच त्यांनी आपली नावे उघड केली. मात्र, मुद्देमालाबाबत समाधानकारक माहिती देण्यात ते अपयशी ठरले. त्यामुळे पोलिसांनी या दोघांना तात्काळ ताब्यात घेतले. त्यांच्याकडून१० हजार रुपयांचे वेल्डिंग साहित्य आणि २० हजारांची मोपेड असा एकूण ३० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मार्केट यार्डमधून २१ हजारांची भांडी लंपास
दसऱ्याच्या खरेदीसाठी शहरात आलेल्या बीड जिल्ह्यातील एका हॉटेल व्यावसायिकाची तब्बल २१ हजार ६३० रुपयांची नवीन स्टील भांडी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना मार्केट यार्ड परिसरात बुधवारी (दि. १) सायंकाळी घडली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर बाळासाहेब अनारसे (वय २८, रा. केरुळ, ता. आष्टी, जि. बीड) असे फिर्यादी व्यावसायिकाचे नाव आहे. ते आपल्या हॉटेलसाठी स्टीलच्या भांड्यांची खरेदी करण्यासाठी अहिल्यानगर येथे आले होते. शहाजी रोडवरील कापड बाजारातून त्यांनी भांडी खरेदी केली होती. सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास, अनारसे हे त्यांच्या मित्रांसोबत मार्केट यार्ड परिसरातील महावीर कंपनी ट्रेडर्सजवळ पोहोचले. त्यांनी खरेदी केलेली भांडी महिंद्रा जीतो मालवाहतूक गाडीच्या मागील बाजूस ठेवून, गाडी लॉक करून इतर खरेदीसाठी बाहेर पडले. मात्र, सव्वा तासानंतर परत आल्यानंतर, भांड्यांची गोणी गायब असल्याचे लक्षात आले. घटनेनंतर अनारसे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
हॉटेल व्यावसायिकेला जीवे मारण्याची धमकी
गांधीनगर येथील शिवकृपा हॉटेलच्या मालकिणीसह त्यांच्या मुलाला आणि भाच्याला दोन भावांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली असून, याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात दोघा भावांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उषा विकास वाबळे (वय ३४, रा. गांधीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, समीर अमन शेख आणि अमीर अमन शेख (दोघे रा. आंबेडकर चौक, गांधीनगर)याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी (दि. २) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास शिवकृपा हॉटेलजवळ दोन्ही आरोपींनी उषा वाबळे, त्यांचा मुलगा उत्कर्ष व भाचा प्रथमेश गांगडे यांना कोणत्याही कारणाविना शिवीगाळ केली, तसेच धक्काबुक्की करत तुमचे हॉटेल व बेकरी चालू देणार नाही, अशी धमकी दिली. त्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला. या प्रकारानंतर वाबळे यांनी तात्काळ तोफखाना पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.