अहिल्यानगर | नगर सह्याद्री
श्रीगोंदा, पारनेरसह संपूर्ण नगर आणि पुणे जिल्ह्यातील गुंतवणुकदारांचे कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यातील सिस्पे आणि इन्फीनीटी या दोन कंपन्यांच्या माध्यमातून मोठी लूट झाल्याबाबत खासदार निलेश लंके यांनी पहिल्यांदाच दुजोरा दिला. अगस्त्य मिश्रा फरार झाल्याचे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले. त्या अगस्त्य मिश्रा याला दुबईतून आणण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचेही खा. लंके यांनी स्पष्ट केले.
श्रीगोंद्यात काही पत्रकारांशी संवाद साधताना खा. लंके हे पहिल्यांदाच सिस्पेतील घोटाळ्याबाबत बोलले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस हेही उपस्थित होते. खा. लंके म्हणाले, सिस्पेत पैसे जमा करणारा हा शेतकरी आहे आणि जमा करणारा हा बेरोजगार! या दोघांवर कारवाई करण्यापेक्षा ज्याने हे रॅकेट चालवले त्या औताडे, अगस्त्य मिश्रा याच्यावर गुन्हा दाखल करा. हे मी एसपींना सांगितले आहे. मधल्या काळात मी पवार साहेबांना भेटणार आहे आणि यापूवही भेटलो.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे हजारो कोटी रुपये त्या सिस्पेमध्ये गुंतले आहेत हेही सांगितले. पवार साहेबांनी माझ्या पत्राचा संदर्भ देत मुख्यमंत्र्यांना पत्र दिले. याची तत्काळ दखल घेऊन जे कोणी यात दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याबाबतही सांगितले. हे प्रयत्न मी केलेत. मी काय कोणाला सांगितल होते का याच्यात पैसे गुंतवा. मी कमीशन गोळा केले का? नाही! तरीही मी प्रयत्न केले. माझ्यावर टीका करणाऱ्यांना काय केले? काहीच केले नाही.
ज्यांचे पैसे गुंतलेत, त्यांचे पैसे वसुल करण्यासाठी अजुन वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे मार्ग अवलंबत आहोत. जो अगस्त्य मिश्रा दुबईत पळून गेलाय, त्याला माझ्या चॅनलमधून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्याच्याकडून पैसे वसुल करण्यासाठी प्रयत्न करु असेही खा. लंके यांनी स्पष्ट केले.
खा. लंके यांच्या भूमिकेनंतर उपस्थित झालेले मुद्दे आणि काही प्रश्न?
1) ‘मी काय कोणाला सांगितल होते का सिस्पेत पैसे गुंतवा. मी कमीशन गोळा केले का’, असे खा. लंके म्हणालेत. त्याच सिस्पेच्या सुपा शाखेचे उदघाटन खा. लंके यांच्याच हस्ते झाले होते आणि त्यावेळी त्यांनी केलेले भाषण, सिस्पे- इन्फीनीटीसह नवनाथ औताडे, अगस्त्य मिश्रा यांचे केलेले कौतुकाचे भाषण म्हणजेच यात गुंतवणूक करा असे अप्रत्यक्ष सुचवलेच होते ना! खासदारच जर त्या कंपनीच्या कार्यालयाचे उदघाटन करत असेल तर सामान्य जनतेचा त्यावर विश्वास बसणार आणि त्यातून ते गुंतवणूक करणारच! मग, आता सहा महिन्यानंतर त्यांना ही उपरती कशी आली?
2) खा. लंके म्हणाले, ‘सिस्पेत पैसे जमा करणारा बेरोजगार’. शेतकऱ्याने त्या बेरोजगार एजंटच्या माध्यमातून पैसे लावले. त्या एजंटने कोट्यवधी रुपये कमिशनमधून मिळवले. मग असे असताना त्याला आरोपी करु नका, अशी मागणी करण्यात खा. लंके हे नक्की कोणाला वाचवत आहेत?
3) ‘सिस्पे घोटाळ्याबाबत शरद पवारांना भेटलो’, असे खा. लंके सांगत आहेत. मात्र, त्यावेळी पवार यांना भेटताना सोबत कोण होते याचा खुलासा करणे त्यांनी सोयीस्करपणे का टाळले? (त्या भेटीचे फोटो त्याचवेळी नवनाथ औताडे यांनी सोशल मिडियावर टाकले होते.)
4) पवारांना भेटताना जे सोबत होते, त्यांच्यावरच पुढे गुन्हा दाखल झाल्यानंतर हे आरोपी फरार कसे? त्यांना फरार होण्यात कोणी मदत केली?
5) ‘ अगस्त्य मिश्रा दुबईत पळून गेलाय, त्याला माझ्या चॅनलमधून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत’, असे खा. लंके यांनी म्हटले आहे. देश आणि राज्यपातळीवरील पोलिस यंत्रणेपेक्षा लंके यांची खासगी समांतर यंत्रणा आहे काय? राज्य आणि केंद्रातील गृह विभागाच्या यंत्रणेवर त्यांचा विश्वास नाही का?
6) सिस्पेबाबत मार्च 2025 पासून ओरड सुरू आहे आणि गुंतवणूकदार हवालदिल होऊन पोलिसांच्या दारात बसले असताना सहा महिने खा. लंके या विषयावर का बोलते झाले नाही?