मुंबई | नगर सह्याद्री
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन जयंत पाटील पायउतार झाले आहेत. जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता शशिकांत शिंदे यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. 15 जुलै रोजी शशिकांत शिंदे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार असल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांआधी जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदावरुन मुक्त करा, अशी मागणी केली होती.
10 जून रोजी झालेल्या पक्षाच्या वर्धापन दिनीच केली होती. मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली. सात वर्षाचा कालावधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे. तुम्हा सर्वांदेखत साहेबांना विनंती करेन, शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे. पवार साहेबांनी यावर योग्य निर्णय घ्यावा. आपल्याला बरेच पुढे जायचे आहे, असं जयंत पाटील म्हणाले होते. पण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बघता जयंत पाटीलच प्रदेशाध्यक्ष राहतील असं सांगण्यात येत होतं. मात्र, आता त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
शशिकांत शिंदे हे नवे प्रदेशाध्यक्ष होणार आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद मिळणार असल्यासंदर्भातील बातमी प्रसिद्ध होताच शशिकांत शिंदे यांनी प्रदेशाध्यक्षपदाबाबत अजून नाव निश्चित नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. पवार साहेब, सुप्रिया ताई, जयंत पाटील आणि पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल. 15 तारखेला पक्षाची बैठक आहे, काही नावं चर्चेत आहेत, माझंही नाव चर्चेत आहेत. ज्यावेळेला निर्णय होईल, निवड होईल त्यावेळी निश्चितपणानं काम करु, असे शशिकांत शिंदे म्हणाले.