कोल्हापूर / नगर सह्याद्री :
राज्य पातळीवर शरद पवार आणि अजित पवार गट वेगवेगळे असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मात्र राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येताना दिसत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात भाजपला दूर ठेवत दोन्ही राष्ट्रवादींनी हातमिळवणी केली आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वतः पुढाकार घेऊन कुपेकर गट आणि राजेश पाटील गटाला एकत्र आणले आहे.
चंदगड नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी ‘राजर्षी शाहू विकास आघाडी’ स्थापन करण्यात आली आहे. यात शरद पवार गट आणि अजित पवार गटातील स्थानिक नेते एकत्र लढणार आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसलाही या आघाडीत सामावून घेण्याची तयारी दाखवली जात आहे.
“भाजप स्थानिक निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला सोबत घेत नाही, त्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी नेत्यांना एकाकी पाडले जाऊ शकते. त्यामुळेच स्वतंत्र आघाडी उभी करून निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे,” असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
मागच्याच विधानसभा निवडणुकीत नंदाताई बाभुळकर आणि राजेश पाटील हे एकमेकांविरोधात रिंगणात उतरले होते. मात्र आता नगरपालिका निवडणुकीसाठी ते एकाच आघाडीत दिसणार आहेत. बीड नंतर कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याच्या या घटनेमुळे महायुतीला स्थानिक पातळीवर धक्का बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.



