अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
शहरातील न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या प्रवेशद्वाराजवळ विद्यार्थ्यावर अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली शनिवारी दुपारी घडलेल्या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. हल्यात १७ वर्षीय युवराज अशोक खाडे (रा. शास्त्रीनगर, केडगाव) जखमी झाला आहे.
याप्रकरणी जखमी युवराजचे वडील अशोक ध्यानू खाडे यांनी फिर्यादी दिली आहे. हल्लेखोरांनी युवराजला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून, त्याच्या अंगावर बसून गळा दाबला. त्यानंतर धातूच्या वस्तूने गळा व मानेवर गंभीर वार केले. हल्ल्याचा उद्देश जीवे मारण्याचा होता, असा संशय फिर्यादीने व्यक्त केला आहे. हल्ल्यानंतर युवराजला तत्काळ जिल्हा सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्यानंतर प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले असून सध्या तो अतिदक्षता विभागात आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास अधिकारी सपोनि गणेश वारुळे व पोहेकॉ चांगदेव आंधळे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. दरम्यान, पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध घेतला जात असून घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.