मुंबई । नगर सहयाद्री:- बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला झाला आहे. वांद्रे (पश्चिम) येथील त्याच्या घरात घुसून एका दरोडेखोराने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तो जखमी झाला आहे. गुरुवारी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास तो त्याच्या कुटुंबियांसह घरात झोपला असताना ही घटना घडली. सैफ अली खान व करीना कपूर खान यांच्या वांद्रेतील घरात दरोडेखोर शिरला होता. त्याने सैफवर चाकूने हल्ला केला. घरातील इतर सदस्य जागे झाल्यानंतर दरोडेखोर घटनास्थळावरून पळून गेल्याचं पोलिसांनी सांगितलं. सध्या पोलीस त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरोडेखोरांशी झालेल्या झटापटीत त्याच्या मानेला व मणक्याला दुखापत झाली आहे. लीलावती हॉस्पिटलमधून सैफच्या प्रकृतीबद्दल माहिती देण्यात आली आहे. सैफवर त्याच्या घरात अज्ञात व्यक्तीने हल्ला केला. त्याला पहाटे साडेतीन वाजता लीलावती रुग्णालयात आणण्यात आलं. त्याला सहा जखमा झाल्या आहेत, त्यापैकी दोन जखमा खोल आहेत. एक जखम त्याच्या मणक्याजवळ झाली आहे. आम्ही त्याच्यावर शस्त्रक्रिया करत आहोत, असं लीलावती रुग्णालयाचे सीओओ डॉ निरज उत्तमानी म्हणाले.
न्यूरोसर्जन नितीन डांगे, कॉस्मेटिक सर्जन लीना जैन आणि भूलतज्ज्ञ निशा गांधी यांच्याकडून त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतरच सैफच्या प्रकृतीबद्दल जास्त माहिती देता येईल, असंही डॉ. उत्तमणी यांनी सांगितले.गुरुवारी रात्री अभिनेता सैफ अली खानच्या घरात एक अज्ञात माणूस घुसला, त्याने त्याच्या मोलकरणीबरोबर वाद घातला. जेव्हा सैफने हस्तक्षेप करून त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने सैफ अली खानवर हल्ला केला. या घटनेत तो जखमी झाला आहे, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
नोकरांची चौकशी, सात पथके रवाना
आता या संपूर्ण प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून पोलिसांनी सैफ अली खान याच्या घरातील 3 नोकरांची चौकशी सुरू आहे. तर त्यांचे मोबाईल देखील तब्यात घेण्यात आलेले आहे. क्राईम ब्रांचचे अधिकारी दया नायक हे तपास करत असून चोराच्या शोधासाठी मुंबई पोलिसांची 7 पथकं रवाना करण्यात आली आहे
मुंबईतली कायदा सुव्यवस्था ढासळली; शरद पवार
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर चिंता व्यक्त केली आहे.शरद पवार म्हणाले, व्यवस्था किती ढिसाळ झाली हे दिसतंय. दुसऱ्यांदा असा प्रयत्न झालाय, मुख्यमंत्र्यांनी याकडे अधिक गांभीर्याने पाहावं. मुंबईतली कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. या सगळ्या गोष्टी चिंताजनक आहेत. असल्याचं शरद पवार म्हणाले.
सैफ अली खानच्या जीवाला धोका नाही
अभिनेता सैफ अली खानच्या प्रकृतीबाबत त्याच्या टीमने अधिकृत निवेदन जारी केले आहे. ते म्हणाले, सैफ अली खान शस्त्रक्रियेतून बाहेर आला आहे. त्याच्या जीवाला आता कोणताही धोका नाही. तो सध्या बरा आहे आणि डॉक्टर त्याच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहेत. कुटुंबातील सर्व सदस्य सुरक्षित आहेत आणि पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.