ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफवर पंतप्रधान मोदींचे सडेतोड उत्तर
नवी दिल्ली | वृत्तसंस्था
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर आपली धमकी खरी करून दाखवली आहे. भारतावर अतिरिक्त 25 टक्के कर लादण्याच्या कार्यकारी आदेशावर डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली. ही करवाढ 21 दिवसांनंतर म्हणजेच 27 ऑगस्टपासून लागू होईल. रशियाकडून तेल खरेदीमुळे भारतावर ही कारवाई करण्यात आल्याचं आदेशात म्हटलंय. 25 टक्के अतिरिक्त करामुळे अमेरिकेचा भारतावर एकूण आयातकर 50 टक्के झाला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव घेता प्रत्युत्तर दिलं आहे. आमच्यासाठी, आमच्या शेतकऱ्यांचे कल्याण हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. भारत आपल्या शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमारांच्या हिताशी कधीही तडजोड करणार नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, शेतीवरील खर्च कमी करणे, उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करणे, या ध्येयांवर आम्ही सतत काम करत आहोत, असं नरेंद्र मोदी एका कार्यक्रमात म्हणाले.
भारताचं डोनाल्ड ट्रम्प यांना प्रत्युत्तर
भारत सरकारने रशियाचंच उदाहरण देत ट्रम्प यांना प्रत्युत्तर दिलं होतं. ज्या रशियाचं नाव घेऊन डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला धमकावलं आहे, त्याच रशियाकडून अमेरिका व युरोपियन युनियन कच्चा माल आयात करत असल्याचा दाखला भारतानं दिला आहे.युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिका व युरोपियन राष्ट्रे रशियाकडून तेल आयात करतो म्हणून भारतावर सातत्याने टीका करत आहेत. पण युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून तेलाचे उपलब्ध पुरवठा पर्याय हे युरोपकडे वळवण्यात आले. त्यामुळेच भारतानं रशियाकडून तेल आयात करायला सुरुवात केली, असं भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
अन्यायकारक निर्णय : रणधीर जयस्वाल
ट्रम्प यांनी केलेल्या अतिरिक्त 25 टक्के आयात शुल्काच्या घोषणेनंतर भारताने अमेरिकेला ठणकावलं आहे. अमेरिकेचा हा निर्णय अत्यंत दुर्दैवी, अवास्तव आणि अन्यायकारक असल्याचं भारताने म्हटलं आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट शेअर करत ही प्रतिक्रिया दिली आहे. इतर अनेक देशांनी स्वतःच्या राष्ट्रीय हितासाठी केलेल्या कृतींसाठी अमेरिकेने भारतावर अतिरिक्त शुल्क लादण्याचा निर्णय घेणं अत्यंत दुर्दैवी आहे. ही कृती अन्यायकारक व अवास्तव आहे. भारत आपल्या राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व पावले उचलेल.