अहिल्यानगर । नगर सहयाद्री-
मे महिन्यात अहिल्यानगरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु त्यानंतर मात्र पावसाने दडी मारली. जून महिन्यातील बहुतांशी दिवस कोरडे गेल्यानंतर जुलै महिन्यात दमदार पावसाची अपेक्षा होती, मात्र जुलै महिन्यातील पहिल्या 4 दिवसांत किरकोळ पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.
पावसाने दडी मारल्याने खरीपातील पिकांची वाढ थांबली आहे. जिल्ह्यात 34 दिवसांत 84.4 मिमी पाऊस झाला. गेल्या वष याच कालावधीत जिल्ह्यात 187.4 मिमी पाऊस झाला होता. गेल्या वषच्या तुलनेत यंदा 103 मिली पावसाची तूट निर्माण झाली आहे. यंदा मे महिन्यातील 24 दिवसांत 220 मिमी अवकाळी पाऊस झाला होता. मे महिन्यातील अवकाळीनंतर जूनपासून दमदार पावसाला सुरुवात होईल, अशी अपेक्षा होती, मात्र जून महिन्यात किरकोळ पाऊस झाला. जिल्ह्याची जून ते सप्टेंबर ही वार्षिक पावसाची सरासरी 448 मिमी आहे. जून महिन्याची सरासरी 108 मिमी आहे. 1 जून ते 4 जुलैपर्यंत जिल्ह्यात 84.4 मिमी पाऊस झाला. पुढील 4 दिवस जिल्ह्यात किरकोळ व हलक्या पावसाची अंदाज वर्तवला आहे.
कोठे किती पाऊस ?
जिल्ह्यात 1 जून ते 4 जुलै या कालावधीत अकोले, पारनेर व संगमनेर या तालुक्यातच 100 मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. सर्वाधिक अकोले तालुक्यात 163, पारनेर तालुक्यात 115 व संगमनेर तालुक्यात 109 मिली मीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सर्वात कमी पाथडत 50 मिमी पाऊस झाला आहे. उर्वरित तालुक्यांत 100 मिमीपेक्षा कमी पाऊस झाला आहे