पारनेर । नगर सहयाद्री:-
केंद्र शासनाच्या ॲग्रिस्टक योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना फार्मर आयडी (शेतकरी ओळखपत्र) असणे अनिवार्य आहे.अन्यथा कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर आयडी काढावेत आसे आवाहन तहसिलदार गायत्री सौंदाणे यांनी दिली.
तहसिलदार सौंदाणे यांनी माहीती देताना सांगितले की ,कुठल्याही नैसर्गिक आपत्तीत शेतमालाची नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई-पंचनामा प्रक्रिया सुरू करताना पंचनाम्यात शेतकरी ओळखपत्र क्रमांक नोंदवणे आवश्यक आहे. ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक आणि तांत्रिक सहाय्य प्रदान करते,ज्यामुळे शेतीतील उत्पादकता वाढवण्यास मदत होते.
फार्मर आयडी नसलेल्या शेतकऱ्यांना ही सुविधा मिळणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपला आयडी प्राप्त करावा,फार्मर आयडी मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी गावातील सेतु केंद्राशी संपर्क साधावा आणि आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. यामध्ये आधार कार्ड, जमिनीचे कागदपत्रे आणि बँक खाते तपशील यांचा समावेश आहे. ॲग्रिस्टक योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, बियाणे आणि खते यासाठी अनुदान मिळते.यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच फार्मर आयडी मिळवून योजनेचा लाभ घ्यावा.
ॲग्रीस्टॅक सरकारची डिजिटल योजना
ॲग्रीस्टॅक ही भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे राबविली जाणारी डिजिटल योजना आहे. याचा उद्देश शेतकऱ्यांचे डिजिटल डेटाबेस तयार करणे, शेतीशी संबंधित माहिती एकत्रित करणे आणि शासकीय योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हा आहे. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांची जमीन, पिके, उत्पन्न,आणि इतर माहिती डिजिटल स्वरूपात संकलित केली जाते. यामुळे शेतकऱ्यांना कर्ज, विमा, अनुदान आणि इतर सुविधा मिळवणे सोपे होते.