अहिल्यानगर | नगर सहयाद्री:-
वडगाव गुप्ता येथील धुमाळ वस्तीमध्ये राहणाऱ्या सोपान जगन्नाथ गिते (वय 62) या शेतकऱ्याने आर्थिक फसवणूक आणि मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मिनाबाई गिते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून योगेश मोहन कापसे, एन.के. भुजबळ आणि पवन रमेश भालेराव यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीतील माहितीनुसार, श्रीराम फायनन्सच्या लिलावातील वाहन खरेदीसाठी गिते यांनी वरील तिघा आरोपींना एकूण 25 लाख रुपये दिले होते. मात्र, वाहन न देता त्यांना वारंवार फसवून, शिवीगाळ आणि धमक्या दिल्या गेल्या. पैसे मागूनही आरोपी टाळाटाळ करत असल्याने गिते मानसिक तणावात गेले होते.
सततच्या त्रासाला कंटाळून 8 जुलै रोजी सकाळी 8:30 वाजता सोपान गिते यांनी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली.
26 जुलै रोजी त्यांच्या पत्नी मिनाबाई गिते यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी यांनी घटनास्थळी भेट देत प्राथमिक तपास सुरू केला आहे. तिघांविरुद्ध भारतीय न्यायदंड संहितेच्या (BNS) कलम 400 (आत्महत्येस प्रवृत्त करणे), 351(2) (मानसिक त्रास), आणि 352 (फसवणूक) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरू आहे.