श्रीगोंदा । नगर सहयाद्री:-
कर्जत तालुक्यातील छोट्या चापडगाव या गावातून उगवलेली प्रेरणादायी कहाणी सध्या सर्वत्र चर्चेत आहे. शेतात मजुरी करणाऱ्या वडिलांच्या कष्टावर वाढलेला मुलगा, आज राज्य सरकारचा क्लासवन अधिकारी झाला आहे. ही यशोगाथा आहे दीपक सुरेश विधाते यांची.
दीपकचे वडील सुरेश विधाते हे शेतमजूर. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही मुलाच्या शिक्षणासाठी त्यांनी कधीच हार मानली नाही. मी नाही शिकलो, पण माझा मुलगा अधिकारी झाला पाहिजे, ही त्यांची जिद्द दीपकसाठी प्रेरणास्थान ठरली.
ग्रामीण शाळेतून शिक्षण घेत, मर्यादित साधनसंपत्तीमध्ये दीपकने सातत्यपूर्ण अभ्यास केला. दिवसाचे 12 तास परिश्रम घेत, त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एमपीएससी परीक्षेत चमकदार यश मिळवले. त्याची सहाय्यक वनसंरक्षक पदासाठी निवड झाली आहे.
दीपकच्या यशाचे गावकऱ्यांनी फटाके फोडून, मिठाई वाटून आणि अभिनंदन फलक लावून स्वागत केले .दीपकने आमच्या गावातील तरुणांना प्रेरणा दिली आहे. मेहनत, सातत्य आणि पालकांचा आशीर्वाद असेल, तर अशक्य काहीच नाही, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली. माझ्या आईवडिलांच्या त्यागामुळेच मी हे स्थान गाठू शकलो. हे यश त्यांचंच आहे. अशी प्रतिक्रिया दीपक विधाते यांनी दिली.



