पारंपारिक वाद्य, डीजेच्या ठेक्यावर तरुणांनी धरला ठेका
अहमदनगर | नगर सह्याद्री-
गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या… एक दोन तीन चार… गणपतीचा जयजय कार.. अशा भावपूर्ण घोषणा देत लाडक्या बाप्पाला गणेश भक्तांनी भावपूर्ण निरोप दिला. पारंपारिक वाद्यांसह डिजेच्या ठोक्यावर तरुणांनी ठेका धरल्याचे पहावयास मिळाले. मानाच्या श्री विशाल गणपतीच्या मिरवणुकीला साडेदहा वाजता सुरुवात झाली. पहिला मानाचा गणपती पावणे आठ वाजता दिल्लीगेट वेशीबाहेर पडला होता.
शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्या हस्ते उत्थापन पुजा संपन्न होऊन मुख्य मिरवणुकीस साडेदहा वाजता प्रारंभ झाला. फुलांनी सजविलेल्या रथामध्ये श्रीगणेश मुर्ती ठेवण्यात आली होती. तसेच सनई चौघडा, रूद्रनाद, युगंधर ढोल पथकाचे वादन तसेच ब्रम्हाश्त्र संस्थेच्या वतीने पारंपारीक खेळ सादर करण्यात आले.
यामध्ये शिवकालीन खेळांचे प्रात्याक्षिक दाखविण्यात आले. दरम्यान, सायंकाळी ११ मानाची गणेश मंडळे, शिवसेनेच्या ठाकरे व शिंदे गटाची दोन, उद्योजक सचिन कोतकर यांच्या मार्गदर्शनाखालीत स्पंदन प्रतिष्ठानने व इतर अशी एकूण १७ गणेश मंडळे मुख्य मिरवणुकीत सहभागी झाली होती. पहिला मानाचा गणपती पावणे आठ वाजता दिल्लीगेट वेशीबाहेर पडला. त्यानंतर विसर्जन मिरणूक रेंगाळली. रात्री बारा वाजता मिरवणूक संपली. गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी नगर शहर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता.
२० डीजे पोलिसांच्या ताब्यात
नगर शहरात मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. यात काही मंडळे वगळता गणेश मंडळांनी गणपती विसर्जनासाठी डिजे लावला होता. डिजेने आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन केल्यामुळे मिरवणूक संपताच रात्रीच पोलिसांनी २० डिजे पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. बुधवारी दुपारपर्यंत ताब्यात घेतलेल्या डिजे चालक, मालक व गणेश मंडळांवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरु होते.
नाचवल्या नर्तकी
नगर शहरात गणपती विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली. परंतु या विसर्जन मिरवणुकीमध्ये एका गणेश मंडळाने नर्तकी नाचवल्या. त्यामुळे ते गणेश मंडळ चर्चेचा विषय ठरले आहे. एकाच नावाचे दोन गणेश मंडळ असल्याने ते गणेश मंडळे नेमके कोणाचे याबाबत नगर शहरात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
‘स्पंदन’च्या मिरवणुकीने वेधले नगरकरांचे लक्ष
तब्बल १३ वर्षानंतर स्पंदन प्रतिष्ठानच्यावतीने गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला होता. स्पंदनच्या मिरवणुकीत असलेल्या रेकॉर्ड ब्रेक गर्दीमुळे आणि शक्ती प्रदर्शनामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. माजी महापौर संदीप कोतकर यांनी महापौर पदाच्या काळात केलेल्या विकास कामांचा चित्ररथ यावेळी पहावयास मिळाला. उदयनराजे पॅलेस इथून काढण्यात आलेली मिरवणूक श्रीछत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. मिरवणुकीमध्ये माजी महापौर संदीप कोतकर यांनी केलेल्या विकास कामाचा रथ आकर्षक व चर्चेचा विषय ठरला. प्रतिष्ठानच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम शीख ईसाई हम सब है भाई भाई असा सामाजिक एकतेचा संदेश यावेळी देण्यात आला. मिरवणुकीमध्ये उद्योजक सचिन कोतकर, आदित्यनराजे कोतकर, उदयनराजे कोतकर कार्यकर्त्यासमवेत थिरकले.