बारामती । नगर सहयाद्री:- 
बारामतीत एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थिनीने नामांकित उद्योगपतीवर वारंवार बलात्कार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पोलिसांनी आरोपीविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
पीडित तरूणी आणि आरोपी उद्योगपती यांची ओळख २०२१ साली बारामतीत झाली. मोठ्या व्यवसायिक असल्याचा दावा करून उद्योगपतीने तरूणीचा विश्वास जिंकला. त्यानंतर पीडित तरूणी आणि तिच्या मैत्रिणीला नोकरी लावण्याचे आमिष दाखवत आरोपीने जवळीक साधली.
२०२१ साली आरोपीने चारचाकीमध्ये पीडितेवर जबरदस्ती केली, नंतर लग्नाचे खोटे वचन देत विविध हॉटेलमध्ये शारीरिक संबंध ठेवले. २०२२ साली पीडित तरूणीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न झाले. २०२३ सालीही आरोपीने लग्नाचे आश्वासन देत पीडितेवर शारीरिक दबाव ठेवला, असा आरोप आहे.
२०२५ साली तरूणीने लग्नाबाबत विचारणा केली असता आरोपीने समाजातील प्रतिष्ठेचा हवाला देत लग्नास नकार दिला. तसेच प्रेग्नन्सी टाळण्यासाठी आरोपीने गोळ्या दिल्या, असेही पीडितेने पोलिसांना सांगितले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस तपास सुरू आहेत. घटनाक्रम २०२१ ते १५ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत घडल्याचे म्हटले जाते.



 
                                    
