पिंपरी पठार, वेसदऱ्यात लाभार्थ्यांची बोगस यादी: सरपंच शिंदे
पारनेर । नगर सहयाद्री:-
पारनेर तालुक्यातील पिंपरी पठार व वेसदरे गावांमध्ये मे २०२५ मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती, पिके व फळबागांच्या नुकसानीबाबत शासनाकडून मदतीसाठी तयार करण्यात आलेली लाभार्थी शेतकऱ्यांची यादी बोगस असल्याचाआरोप पिंपरी पठारचे सरपंच अनिल शिंदे यांनी केला आहे. तत्कालीन ग्राममहसूल अधिकारी श्री. राऊत आणि कृषी सहाय्यक श्री. भालेराव यांनी शेतीची प्रत्यक्ष पाहणी न करता, पंचनाम्याविना बनावट यादी तयार केली, ज्यामुळे खरे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहावे लागले, तर काही अपात्र नावांना यादीत समाविष्ट करण्यात आले. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याबाबत पिंपरी पठारचे सरपंच अनिल शिंदे व वेसदरेचे माजी सरपंच किशोर रोकडे यांनी तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. यादीतील शेतकऱ्यांची निवड कोणत्या निकषांवर झाली, हे स्पष्ट करावे. पंचनाम्याच्या प्रती, शेतांचे फोटो, पिकांचे (विशेषतः कांदा) नुकसान दर्शवणारे पुरावे, स्थानिक जबाब या सर्व गोष्टी ग्रामपंचायतीला सादर कराव्यात. अशी मागणी करत ग्राम महसूल व कृषी सहाय्यक अधिकाऱ्यांनी त्या काळात शेती पिकाच्या पंचनाम्यांची बनावट यादी तयार करून शेतकऱ्यांची व शासनाची फसवणूक केली असल्याचा आरोप केला आहे.
या प्रकारामुळे गावांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे .तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांनी यावर गंभीर दखल घेत प्राथमिक चौकशी सुरू केल्याचे संकेत दिले आहेत. या घटनेमुळे प्रशासकीय पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, याप्रकरणी पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवणार
ग्राम महसूल व कृषी सहाय्यक अधिकाऱ्यांनी तत्कालीन काळात शेती पिकाच्या पंचनाम्यांची बनावट यादी तयार करून शेतकऱ्यांची व शासनाची फसवणूक केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवणार आहे.
– अनिल शिंदे (सरपंच, पिंपरी पठार)
पंचनाम्याची सखोल चौकशी करा;अमोल ठुबे
पिंपरी पठार व वेसदरे येथे ग्राम महसूल अधिकारी व कृषी सहाय्यक यांनी बनावट पंचनामे तयार केले. असा प्रकार तालुक्यातील इतर गावांमध्ये देखील घडल्याची शक्यता आहे. ग्राम महसूल अधिकारी राऊत यांच्याकडे चार्ज असलेल्या कान्हूर पठार, पिंपळगाव तुर्क या सर्व गावांमधील पीक पंचनामाची चौकशी करावी तसेच शेतकरी वर्गाला न्याय द्यावा अशी मागणी अमोल ठुबे यांनी केली आहे.