अहमदनगर । नगर सहयाद्री
नुकसान भरपाई रक्कम मिळण्यासाठी खोटा अपघात दावा दाखल करून न्यायालयाची व टाटा एआयजी इन्शुरन्स विमा कंपनीची फसवणूक केल्याचे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) चौकशीतून समोर आले आहे. उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने सीआयडीच्या कोल्हापुर परिक्षेत्राचे पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी काल, मंगळवारी (दि. १६) तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दिलेल्या फिर्यादीवरून नगर, श्रीरामपूर, राहुरी तालुयातील पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी/दावेदार आबासाहेब चिमाजी वडीकते (वय ४० रा. कडीत बुद्रुक, जिल्हा परिषद शाळेजवळ, ता. श्रीरामपूर), गुन्ह्याचे तपासी अंमलदार देवीदास काशिनाथ भडकवाड (वय ४८ रा. पोलीस मुख्यालय, नगर), वाहन चालक अल्ताफ सलीम शेख (वय ३६ रा. सुभाष कॉलनी, नेवासा रस्ता, वार्ड नंबर सहा श्रीरामपूर), वाहन मालक यासीन सरदार शेख (वय ४७ रा. सिध्दार्थनगर, कॉलेज रस्ता, वार्ड नंबर एक, श्रीरामपूर), प्रत्यक्ष वाहन ताब्यात असलेला व्यक्ती राजमहमंद सरदार शेख (वय ५४ रा. सक्रापुर, गुहा रस्ता, लांडेवाडी, ता. राहुरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
टाटा एआयजी इन्शुरन्स कंपनीने संशय व्यक्त केलेल्या मोटार अपघात दाव्याची चौकशी करण्याचे आदेश छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला दिले होते. आबासाहेब वडीकते याने दाखल केलेल्या मोटार अपघात दाव्याची फिर्यादी पोलीस निरीक्षक पाटील यांनी चौकशी केली. वडीकते याने ५ जून २०१६ रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात अपघात झाल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्याच्या दुचाकीला २१ एप्रिल २०१६ रोजी टेम्पोने (एमएच १७ बीडी ३६३९) धडक दिल्याचे त्याने फिर्यादीत नमूद केले होते.
याबाबत पोलीस निरीक्षक पाटील यांनी दावेदार, वाहन मालक व चालक, इतर साक्षीदार व तपासी अंमलदार यांच्याकडे चौकशी करून त्यांचे जबाब नोंदविले. एकंदरीत सदर मोटार अपघात दावा चौकशीमध्ये पडताळलेले साक्षीदार, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर, पिपाडा मोटर्स यांनी दिलेला अहवाल, उपलब्ध दस्तऐवज, सिटी केअर हॉस्पिटलमधील मुळ एम. एल. सी., तोफखाना पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्याची कागदपत्रे याची पडताळणी करण्यात आली. संशयित आरोपींनी आपआपसात संगणमत करून कटकारस्थान रचून विमा कंपनीकडून अपघाताचा आर्थिक लाभ मिळविण्याच्या उद्देशाने बनावट दस्तऐवज तयार केला. न्यायालयात खोटे दोषारोपपत्र दाखल केले. त्यानंतर विशेष सत्र न्यायालय नगर येथे अपघात दावा नुकसान भरपाई रक्कम मिळण्यासाठी खोटा अपघात दावा दाखल करून न्यायालयाची व टाटा एआयजी विमा कंपनीची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.