मुंबई | नगर सह्याद्री:-
राज्यात होणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष मोर्चेबांधणी करत आहेत. महायुतीमधील शिवसेना, अजित पवार गट आपल्या पक्षात नेत्यांचा प्रवेश करून घेत आहे. पावसाळ्याआधी पालिकांच्या निवडणुका होतील असा अंदाज आहे. त्यासाठी महायुतीला कामाला लागलीय. मात्र आघाडीत बिघाडी झाल्याचं दिसत आहे. महापालिकांच्या निवडणुकीत मविआला तडा जाण्याची शक्यता आहे. त्याच कारण म्हणजे ठाकरे गटाने या निवडणुकीत स्वबळाचा नारा दिलाय.
स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत आघाडी होत नाही, कार्यकर्त्याला संधी हवी असते, असं म्हणत संजय राऊत यांनी आगामी निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा दिलाय. संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते खूप असतात. त्यांना संधी हवी असते. आघाड्या ह्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत होत असतात. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत प्रत्येक जण आपली ताकद अजमावण्याचा प्रयत्न करतो.
नाशिकच्या सर्व जागा आम्ही लढाव्यात अशी आमची इच्छा असल्याचं विधान ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणालेत. मुंबई महापालिकेची पाच वर्षाची मुदत 7 मार्च 2022 रोजी संपली. त्यानंतर राज्यात सत्तेत आलेल्या उद्धव ठाकरेंच्या सरकराने पालिकेच्या प्रभाग रचनेत बदल केला. प्रभाग संख्या 227 ऐवजी 236 करण्यात आलीय. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे यांच्या सरकराने प्रभाग संख्या 227 केली. याविरोधात आक्षेप घेत ठाकरे गटाकडून उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. मात्र न्यायालयाने सरकारचा निर्णय कायम ठेवला. त्यामुळे ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायायलयात धाव घेतली.