विश्वासघातकी विठ्ठल लंघेंना जागा दाखवा / बाळासाहेब मुरकुटेंचा आरोप | प्रहार अन् बच्चू कडूंचा विश्वासघात
नेवासा | नगर सह्याद्री
केसाने गळा कापण्याचे काम पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. त्यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपाने माझ्यावर अन्याय केला. कायम बुक्क्याचे धनी असणारे तडजोडीबहाद्दर विठ्ठल लंघे यांना यशवंतराव गडाखांनी ताकद दिली. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दिले. सार्या राजकीय पक्षांचा प्रवास करणार्या लंघे यांनी सार्यांचाच विश्वासघात करत गद्दारी केली. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ज्या गडाखांन विठ्ठलराव लंघे यांना दिले, त्या विठ्ठलरावांनी गडाखांचा विश्वासघात केला. विश्वासघातकी लंघे हे तुमचे कधीच होऊ शकणार नसल्याने त्यांना त्यांची जागा दाखवा असे आवाहन माजी आमदार व नेवासा मतदारसंघातील प्रहारचे उमेदवार बाळासाहेब मुरकुटे यांनी केला. सार्यांनी विश्वासघात केला असताना प्रहार आणि बच्चू कडू यांनी मदतीचा हात पुढे केल्याचा उल्लेखही मुरकुटे यांनी आवर्जुन केला.
नेवासा मतदारसंघातील प्रहारचे उमेदवार माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी त्यांची उमेदवारी केली आहे. त्यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत बोलतान मुरकुटे यांनी आपला विजय निश्चित असल्याचे सांगितले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्रहारचे संस्थापक बच्चू कडू हे होते. नेवासा तालुक्यातील जनता तनमनधनाने माझ्या सोबत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मतदारसंघातून माझ्यासाठी उमेदवारी मागण्यासाठी विठ्ठल लंघे हे माझ्यासोबत होते. मात्र, त्यांनी विश्वासघात केला आणि स्वत:ची उमेदवारी मिळवली. अत्यंत विश्वासघातकी प्रवृत्ती असणार्या लंघे यांना कदापी माफ करणार नाही असे मुरकुटे यांनी ठासून सांगितले. कायम दुसर्याचा टेकू घेऊन राजकारण करत असणार्या लंघे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा आणि शिंदे यांची शिवसेना असा प्रवास केला आहे. शेजारी घुले यांच्या कारखान्यात ते संचालक म्हणून निवडून येऊ शकत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला. विठ्ठल लंघे यांनी मोठे षडयंत्र रचले आणि माझा विश्वासघात केल्याचेही त्यांनी म्हटले.
अन्यायाचा वचपा काढण्यासाठी आता गावागावातील कार्यकर्ते सज्ज झाले असून त्यांनीच याचा वचपा काढावा असे आवाहन यावेळी त्यांनी केले. राजकारण करताना यापुढच्या काळात अर्धी भाकरी मला मिळाली तर त्यातील चतकोर तुम्हाला देईल, पण तुम्हाला उपाशी राहू देणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या तालुक्यात विरोध जिवंत ठेवण्यासाठी मी उभा असून कोणतीही सेटलमेंट कधीच करणार नाही. तुमच्यासाठी जिवात जीव असे पर्यंत लढणार असेही त्यांनी सांगितले. स्वार्थी मतलबी राजकारण करणारे लंघे हे कायम गडाख- घुले यांच्याशी हात मिळवणी करत आले असल्याचा आरोप करतानाच वीस वर्षे ज्ञानेश्वर कारखान्यात संचालक म्हणून लंघे यांना घुले यांनीच संधी दिली. त्यातच सारे काही समजून घ्या, असेही मुरकुटे यांनी म्हटले.
गडाखांनी चौथा पुत्र मानला, तरीही त्यांच्या विरोधात!
कोणतीच लायकी नसताना गडाखांनी झाले गेले विसरुन विठ्ठल लंघे यांना थेट जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दिले. राज्यमंत्री पदाचा दर्जा असणारे हे पद लंघे यांना स्वप्नात देखील मिळाले नसते. मात्र, गडाखांनी त्यांना हे पद दिले. चौथा पुत्र असल्याचे जाहीर वक्तव्य त्यावेळी गडाख यांनी केले होते. स्वत:चा मुलगा समजून लंघे यांना संधी दिली असताना तेच लंघे पुढे त्याच गडाखांच्या विरोधात उभे ठाकले आणि आताही उमेदवारी करत आहेत. जे लंघे गडाखांचे झाले नाही, ते नेवासा तालुक्यातील सामान्य जनतेचे कसे होतील असा रोकडा सवालही बाळासाहेब मुरकुटे यांनी उपस्थित केला.