Maharashtra politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्रात आणखी एका प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. आता भाजपच्या एका मंत्र्यावर अत्यंत गंभीर आरोप झाले आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राऊतांनी दावा केला आहे की, गोरे यांनी एका महिलेला नग्न फोटो पाठवले आणि तिचा छळ केला.
काही मीडिया रिपोर्टनुसार, जयकुमार गोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका महिलेसोबत गैरवर्तन केले. त्या महिलेला सतत त्रास दिला जात असल्याचा आरोपही आहे. विशेष म्हणजे, या महिलेनं यापूर्वी गोरे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.
संजय राऊत यांनी देखील या प्रकरणी मोठा दावा केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांची नव्याने तपासणी करावी. धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागतो, पण भाजपच्या मंत्र्यांवर कारवाई केली जात नाही. जयकुमार गोरे यांनी एका महिलेचा छळ केला, तिला नग्न फोटो पाठवले, आणि आता ती महिला विधानभवनासमोर उपोषणाला बसणार आहे. असं राऊत यांनी सांगितलं.
महिलेने याबाबत तक्रार केली असून जयकुमार गोरे यांनी 2016 पासून तिला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला. तक्रार केल्यानंतरही त्यांना अटक झाली नव्हती. अखेर, सातारा जिल्हा न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आणि त्यांना 10 दिवस तुरुंगात राहावे लागले होते. विशेष म्हणजे, त्यानंतर त्यांनी लेखी माफी मागितली होती, पण तरीही महिलेला पुन्हा त्रास दिला जात असल्याचा आरोप आहे.
गोरेंनी याप्रकरणी सातारा जिल्हा न्यायालयात माफीनामा दिला होता अशी माहिती आहे. मात्र, आता पुन्हा त्रास दिला जातोय अशीही तक्रार पीडित महिलेनं केली आहे. विजय वडेट्टीवार यांनीही भाजप सरकारवर हल्लाबोल करताना म्हटलं, “एक मंत्री महिलेला नग्न फोटो पाठवतो, जेलमध्ये जातो, आणि नंतर पुन्हा तिच्या मागे लागतो. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला, मग जयकुमार गोरे यांचा का नाही?”, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. संजय राऊत यांनी यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहणार असल्याचे सांगितले आहे.