अहमदनगर। नगर सहयाद्री:-
महात्मा फुले कृषी विद्यापीठात एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यात वरिष्ठ अधिकाऱ्यावर महिलांकडून शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या अधिकाऱ्याने महिलांना कामावर राहण्यासाठी शारीरिक संबंधांची मागणी केली आणि नकार देणाऱ्यांना ठेकेदाराच्या माध्यमातून कामावरून काढून टाकले असे सांगण्यात आले आहे.
या प्रकरणाची तक्रार संबंधित महिलांनी विद्यापीठ प्रशासनाकडे दाखल केली असून, कुलसचिवांनी त्वरित चौकशीचे आदेश दिले आहेत आणि अहवाल मागवला आहे. तथापि, अद्याप चौकशी अहवाल सादर झालेला नाही. कृषी सहायक पदावरील वरिष्ठ अधिकाऱ्याने महिला मजुरांकडे “कामावर राहायचे असेल तर माझी मर्जी पूर्ण करा” असे म्हणत शारीरिक संबंधांची मागणी केली.
सुटीच्या दिवशीही या अधिकाऱ्याने महिलांना कामावर बोलावून घेतले. एका महिलेला नकार दिल्यानंतर ठेकेदाराला सांगून तिला कामावरून काढून टाकण्यात आले. आणखी एका महिलेला देखील अशीच मागणी करून तिला कामावरून काढून टाकले.या प्रकरणामुळे विद्यापीठ परिसरात खळबळ उडाली असून, घटनेची सत्यता पडताळण्यासाठी चौकशी सुरु आहे.