अहमदनगर। नगर सहयाद्री
घरात घुसून तरूणीचा धारदार शस्त्राने गळा कापून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना बोल्हेगाव उपनगरातील गांधीनगरमध्ये घडली. कोमल अशोक मोहिते (रा. महादेव मंदिरासमोर, गांधीनगर, बोल्हेगाव) असे जखमी तरूणीचे नाव आहे. तिच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी तिचा भाऊ सुरज अशोेक मोहिते (वय ३० रा. महादेव मंदिरासमोर, गांधीनगर, बोल्हेगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात एका जणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमनाथ वैरागर (पूर्ण नाव, पत्ता नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. कोमल नगर शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असताना तिची सोमनाथ सोबत ओळख झाली होती.
ती बुधवारी (दि. १५) सकाळी घरी असताना सोमनाथ तेथे आला. त्याने त्याच्याकडील धारदार शस्त्राने कोमलचा गळा कापून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याची माहिती कोमलनेच फोनवरून तिचा भाऊ सुरज यांना दिली. जखमी कोमल हिला उपचारासाठी सुरजचा मित्र विकास रोमन यांनी जिल्हा रूग्णालयात दाखल केले. तेथे तिच्यावर उपचार सुरू असून सुरज यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे अधिक तपास करत आहेत.