संगमनेर । नगर सहयाद्री:-
संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक शिवारात असलेल्या शिवमंदिराच्या सभामंडपात सकाळी ७ वाजता एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. भाऊसाहेब विठ्ठल बाचकर (रा. जांभुळबन, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) असे मयत तरुणाचे नाव आहे.
या संदर्भात घारगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.मंदिराच्या सभामंडपात मृतदेह दिसताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि घटनास्थळाची पाहणी केली.
पुढील कार्यवाहीसाठी मृतदेह घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला आहे. या प्रकरणी शिवाजी विठ्ठल बाचकर यांनी घारगाव पोलिसांत दिलेल्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून, पोलीस नाईक डी. एम. चौधरी हे पुढील तपास करत आहेत. तरुणाचा मृतदेह मंदिर परिसरात सापडल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. मृतदेहाच्या शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे.