अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एमएसईबी ऑफिसजवळील रस्त्यावर गस्त घालणाऱ्या पोलिसांनी सचिन पांडुरंग घोरतले (वय 38, रा. नेवासा) याला अवैध पिस्तूल आणि काडतुसे बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे.
पोलिसांनी 50 हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल आणि एक हजार दोनशे रुपये किमतीचे सहा जिवंत काडतुसे जप्त केली. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलीस हवालदार सलीम रमजान शेख (वय 41, कोतवाली पोलीस ठाणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, नगर कॉलेजच्या भिंतीमागे, दादा पीर दरग्याच्या समोर गस्त घालत असताना सचिन घोरतले हा संशयास्पदरीत्या फिरताना दिसला.
पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे स्टीलचे गावठी पिस्तूल (काळ्या प्लास्टिक आवरणासह) आणि सहा 6 एमएम जिवंत काडतुसे आढळली. ही सर्व सामग्री त्याने परवाना नसताना विक्रीच्या उद्देशाने बाळगली होती.