अहिल्यानगर | नगर सह्याद्री
तुला गाडी चालवता येते का, असे म्हणत दारू पिण्यासाठी पैशांची मागणी करून एका व्यावसायिकाला व त्याच्या मित्राला पाच जणांनी लाथाबुक्क्यांनी व कोयत्याच्या मुठीने मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास प्रोफेसर चौक ते समर्थ शाळेच्या दरम्यान घडली. या प्रकरणी व्यावसायिक सागर पुरुषोत्तम कुकरेजा (वय 33, रा. प्रोफेसर चौक, पराग व्हिला कॉलनी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांना मिळाले आहे.
संकेत महाजन व अविनाश फसले (पूर्ण नाव पत्ते नाही, रा. नगर) यांच्यासह त्यांच्या तीन अनोळखी मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर कुकरेजा व त्यांचे मित्र संतोष रामनानी हे दोघे दुचाकीवरून (एमएच 16 बीए 9045) प्रोफेसर चौक ते गुलमोहर रस्त्यावरून जात असताना समर्थ शाळेजवळ अचानक एका विना क्रमांकाच्या दुचाकीवरून काही युवक त्यांना कट मारून पुढे गेले. दुचाकीवरील युवक पुन्हा मागे येऊन त्यांच्यसमोर थांबला. तुम्हाला गाडी चालवता येते का, असे म्हणत त्याने शिवीगाळ केली. त्याने शिवीगाळ करून दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केल.
सागर यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर राग आल्याने त्याने सागर व त्यांच्या मित्राला धक्काबुकी करत मारण्यास सुरुवात केल. त्याने फोन करून चार – पाच मित्रांना बोलावून घेत मारहाण केली. यात सागर यांच्या गळ्यातील सोन्याची चेन गहाळ झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, सदरचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
उसने पैसे परत मागितल्याने मारहाण
हात उसने दिलेले पैसे परत मागितल्याचा रागातून दोघांनी एकास मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री कायनेटिक चौकातील एका हॉटेलबाहेर घडली. या प्रकरणी जखमी शुभम दत्तात्रय भगत (वय 32, रा. जे जे गल्ली, मंगलगेट) याने दिलेल्या फिर्यादीवरून दोघांवर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संग्राम सूर्यवंशी व त्याचा काळे नावाचा मित्र (पूर्ण नाव माहिती नाही, रा. सारसनगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम याने संग्राम याला काही दिवसांपूव 7 हजार रुपये हातऊसने दिले होते. शुभम वारंवार पैसे मागूनही संग्रामने ते परत केले नव्हते. रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास शुभम व त्याचा मित्र राज नरेश नागुल हे दोघे कायनेटिक चौकातील एका हॉटेलमध्ये गेलो होते. तेथे दुसऱ्या टेबलवर संग्राम सुर्यवंशी हा त्याच्या मित्रासोबत बसलेला होता. शुभम याने संग्रामकडे जाऊन उसने दिलेल्या पैशाची मागणी केली. त्याने 12 वाजेपर्यंत तुझे पैसे देतो, असे सांगितले. त्यानंतर संग्राम सुर्यवंशी हा हॉटेलच्या बाहेर गेला. शुभम व त्याचा मित्र राज हॉटेलच्या बाहेर गेटरसमोर गेले असता, हातऊसने पैसे मागितल्याच्या कारणावरुन संग्राम याने शुभमला मारहाण केली. मारहाणीत संग्राम याने शुभमला काहीतरी टणक वस्तून उजव्या डोळ्याजवळ मारल्याने तो जखमी झाला. मारहाणीत शुभमचा मोबाईल देखील गहाळ झाला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोहेकॉ बी. व्ही सोनवणे करत आहेत.