जमीन खरेदी व्यवहार फसवणूक; चौघांविरुद्ध गुन्हा
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यातील एका 63 वषय शेतकऱ्याची जमीन खरेदी करून देतो, असे सांगून तब्बल 50 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. 2016 ते 2022 या कालावधीत शेंडी व अहिल्यानगर परिसरात ही घटना घडली असून, न्यायालयाच्या आदेशानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हसन अमीर राजे (वय 63, रा. पारनेर) यांनी याबाबत माहिती दिली.
नजीर साहेबलाल शेख, नसीर साहेबलाल शेख, अबिदा अब्बास सय्यद आणि एकनाथ दगडू भगत (सर्व रा. शेंडी, ता. जि. अहिल्यानगर) यांनी संगनमत करून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांना जमीन खरेदी करून देतो असे सांगून, वेळोवेळी एकूण 50 लाख रुपये उकळले. मात्र, व्यवहार पूर्ण झाला नाही किंवा पैसेही परत दिले गेले नाहीत. वर्षानुवर्षे वाट पाहूनही काही न घडल्याने अखेर हसन राजे यांनी न्यायालयात फौजदारी चौकशी अर्ज दाखल केला.
न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून एमआयडीसी पोलिसांनी वरील आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. जमिनीच्या नावावर अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.