पारनेर । नगर सहयाद्री
राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीचा यात्रा उत्सव सध्या मोठ्या प्रमाणात सुरू असून जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसरापासून जवळ असलेल्या गाडीलगाव येथे मध्य रात्री चोरट्यांनी धाडसी चोरी करीत जवळपास नऊ तोळे सोन्याची चोरी केली असून एक मोटरसायकल नेली आहे. दोन बंगले साफ करीत एक ठिकाणी नउ तोळे सोने व दुसऱ्या बंगल्यात पन्नास हजार रुपये किमतीचे सोने व साडेतीन हजार रुपये रोख अशी चोरी केल्याने परिसरात चोरट्यांनी दहशत निर्माण केली आहे.
गाडीलगाव परिसरातील पद्मावती वस्तीवरील प्रविण दिघे, गोकुळ बोदगे यांच्या बंगल्यामध्ये चोरी झाली आहे. सात ते आठ चोरट्यांनी ही चोरी केली असल्याचा अंदाज ग्रामस्थ व्यक्त करीत आहे. निघोज परिसरातील कुंड यात्रा मंगळवार दि.२२ रोजी सुरू झाली असून पहिल्या दिवशी कुंडावर मंगला बनसोडे यांचा तमाशा असल्याने परिसरातील बहुतांश लोकांनी तमाशा पाहाण्याचा बेत केला होता.
त्याचाच फायदा चोरट्यांनी घेतला. गोकुळ बोदगे यांच्या घरात कुणीही नव्हते याचा फायदा चोरट्यांनी उचलला त्यांच्या घरातील रोख साडेतीन हजार रुपये तसेच अर्धा तोळ्याचे सोन्याचे मणी चोरट्यांनी चोरले तसेच प्रविण दिघे यांच्या बंगल्यातील घरातील लोक बंगल्याच्या गच्चीवर झोपले होते याचा फायदा उठवत चोरट्यांनी त्यांच्या बंगल्यात उचकपाचक करीत नउ तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरले तसेच त्यांच्या किचनमध्ये जावून जेवणावर येथेच्छ ताव मारला तसेच जाता जाता दिघे यांची मोटरसायकल चोरुन नेली अशाप्रकारे गाडीलगाव परिसरात जवळपास दहा लाखाची चोरी झाली आहे.
पारनेरचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यानी घटनास्थळी येऊन माहिती घेतली तसेच पोलीसांना मार्गदर्शन करीत चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. नगर येथील ठसे तज्ञ तसेच श्वानपथक या ठिकाणी येऊन गेले असून चोरट्यांचा शोध लवकर लागण्यासाठी पोलिस प्रयत्न करीत आहेत. सध्या यात्रा जत्रा यांचा मोसम सुरू असल्याने जनतेने सतर्क राहावे असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.
निघोज येथील मळगंगा देवीच्या यात्रेसाठी पारनेरचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर, निघोज पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेऊन पाकीटमार, धुमस्टाईल चोऱ्या करणारे चोरटे यांचा बंदोबस्त केला होता. एक दोन अपवाद वगळता निघोजच्या यात्रेत चोऱ्यांचे प्रमाण अत्यल्प ठरले मात्र गाडीलगाव येथील चोरीने पारनेर पोलीसांना चोरट्यांनी आव्हान दिले असून या चोरीचा शोध पोलीस कसा लावतात याकडे जनतेचे लक्ष वेधले गेले आहे.