आप्पा चव्हाण | नगर सह्याद्री
जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतलेल्या श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीमध्ये शेवटच्या टप्प्यात शिवसेना शिंदे गटाच्या शुभांगी पोटे यांच्या विरोधात सर्वजण एकवटले असल्याचे दिसते. राष्ट्रवादीचे तालुयातील सातही नेते एकत्र आले असताना त्यांना पूर्ण पॅनल देता आला नाही. अशीच काही अवस्था महाविकासआघाडीची देखील झाली आहे. शुभांगी पोटे यांचा तळागाळाशी असणारा संपर्क गेल्या चार वर्षात केलेले काम आणि २४ तास उपलब्धता ही त्यांची जमेची बाजू आहे. भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी प्रतिष्ठापणाला लावली असली तरी त्यांनी दिलेला उमेदवार फक्त रबरी स्टॅम्प राहणार असल्याची चर्चा थांबायला तयार नाही.
अजित पवार गटाचे सात नेते एकवटले तरीही लंगडा पॅनल…
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका जिल्हा आणि राज्य पातळीवरील श्रीगोंदा येथील सात नेते आहेत. घनश्याम शेलार, अण्णासाहेब शेलार, राजेंद्र नागवडे, माजी आमदार राहुल जगताप, बाळासाहेब नाहाटा, भगवान पाचपुते, दत्तात्रय पानसरे असे सात नेते एकत्र येऊन प्रचारात सक्रिय आहेत. शुभांगी पोटे यांच्या विरोधात या सात नेत्यांना एकत्र यावे लागले असले तरी त्यांना पूर्ण पॅनल देता आला नाही. त्यांनी उमेदवारी दिलेल्या दोघा उमेदवारांनी पक्षाचे चिन्ह असताना देखील माघार घेतली.
शुभांगी पोटे यांच्यामुळे त्यांनाही द्यावी लागली महिलाना संधी….
श्रीगोंदा शहरातील कानाकोपर्यात असणारा दांडगा संपर्क आणि झालेली कामे या बळावर शुभांगी पोटे यांनी पुन्हा नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून उमेदवारी घेतली. त्यांच्या उमेदवारीचा धसका घेत नगराध्यक्ष पद खुल्या वर्गासाठी असतानाही भाजपा सह महाविकास आघाडी यांना देखील नगराध्यक्ष पदासाठी महिलेला संधी द्यावी लागली.
कारखाना आणि शिक्षण संस्थेच्या कर्मचार्यांना उमेदवारी देण्याची नामुष्की
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सात नेत्यांनी एकत्र येत निवडणुकीची धुरा हाती घेतली असताना प्रत्यक्षात त्यांना चांगले उमेदवार देता आले नाहीत. कुणीच उमेदवारी घ्यायला तयार नसल्याने शेवटी या नेत्यांना त्यांच्या सहकारी साखर कारखान्यात आणि शिक्षण संस्थेत काम करणारे कर्मचारी शोधावे लागले. या पॅनलमध्ये कारखाना आणि शिक्षण संस्थेचे एकूण आठ उमेदवार देण्याची नामुष्की नेत्यांवर ओढवली.
महिला सक्षमीकरणाचा आ. विक्रम पाचपुते यांचा दावा खोटा…
नगराध्यक्षपद खुले असताना भाजपने पर्यायाने आमदार विक्रम पाचपुते यांनी आम्ही महिलेला संधी दिल्याचे सांगत महिला सक्षमीकरण करत असल्याचा दावा केलाय. मात्र हा दावा श्रीगोंदेकरांना मान्य नाही. विधानसभा निवडणुकी वेळी त्यांच्या मातोश्रींना पक्षाने उमेदवारी दिली होती. त्यावेळी त्यांना महिला सक्षमीकरण आठवले नाही का असा थेट सवाल आता श्रीगोंदावासी करत आहेत.
सत्तेचा रिमोट थेट माऊलीवर….
कोथिंबीरे यांना डावालुन खेतमाळीस यांना उमेदवारी देऊन पाचपुते यांनी धुर्त चाल खेळली असल्याचे लपून राहिलेले नाही. पालिकेचा रिमोट कंट्रोल स्वतःच्या हातात राहील याची पुरेपूर काळजी पाचपुते यांनी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे आणि म्हणूनच त्यांनी खेतमाळीस यांना उमेदवारी दिली असल्याची चर्चा रंगली आहे.
साजन पाचपुते यांना अवघी एक जागा….
शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते असलेले साजन पाचपुते यांना श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीतील जागावाटपाच्या धोरणात अवघा एक उमेदवार देता आला. संतोष खेतमाळीस हे एकमेव उमेदवार मशाल या चिन्हावर निवडणुकीत आहेत. याचाच अर्थ राज्य पातळीवर उपनेता म्हणून काम करत असताना देखील साजन पाचपुते यांना फक्त एक जागा दिली गेली. याउलट काँग्रेस प्रभावी नेता तालुयात नसताना देखील काँग्रेस १० जागांवर येथे लढत आहे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नऊ उमेदवार रिंगणात आहेत.
शिवसेना उपजिल्हा प्रमुखाची पत्नी मनोहर पोटेंच्या पॅनलमध्ये…
शिवसेना उपनेते असणार्या साजन पाचपुते यांना त्यांच्याच मैदानात हार मानावे लागत आहे त्यांच्याच पक्षाचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब दुतारे यांच्या पत्नी अनुराधा दुतारे या मनोहर पोटे यांच्या पॅनल मधून उमेदवारी करत आहेत. याचाच अर्थ मनोहर पोटे यांच्या नेतृत्वावर श्रीगोंदा शहरातील सर्वांचाच विश्वास आहे.
सुनीता खेतमाळीस रबरी स्टॅम्प…
भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनीता खेतमाळीस या फक्त सयाजीराव असणार असल्याची चर्चा आहे. भाजपकडून उमेदवारीसाठी नाना कोथिंबिरे, कांतीलाल कोथिंबीरे यांच्यासारखे प्रशासकीय कामाचा अनुभव असणारे व स्वच्छ चेहरा असणारे उमेदवार असताना देखील पाचपुते यांनी त्यांना उमेदवारी दिली नाही. कोथिंबीर यांची उमेदवारी असती तर ही निवडणूक पाचपुते यांना आणि पर्यायाने भाजपला अधिक सोपी गेले असती. मात्र त्यांनी कामकाज करत असताना पाचपुते यांचा हस्तक्षेप मान्य केला नसता आणि त्यातूनच मग त्यांची उमेदवारी कापल्याची चर्चा आहे. खेतमाळीस यांना फक्त खुर्ची द्यायची आणि सर्वाधिकार स्वतःकडे ठेवण्याची चाल आ. पाचपुते यांनी खेळली असल्याचे लपून राहिले नाही.
मनोहर पोटेंचा वाढता प्रभाव विरोधकांची डोकेदुखी
तालुयातील वाढता प्रभाव आणि वाढता जनसंपर्क विचारात घेत मनोहर पोटे यांच्या विरोधात तालुयातील सारे पुढारी नगरपालिका निवडणुकीचे निमित्ताने एकत्र आल्याचे दिसते. मनोहर पोटे हे शिवसेनेच्या माध्यमातून उद्याच्या राजकारणात पर्यायाने जिल्हा परिषद निवडणुकीत तालुयातील राजकारणाचा वेगळा भाग होणार असल्याने त्यांना येथेच रोखण्यासाठी हे सर्व दिग्गज मंडळी एकत्र आली आहेत अशी चर्चा रंगली आहे.



