Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. कोर्ट आणि पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर मराठा आंदोलकांना आझाद मैदान सोडायला सांगितले. मुंबई पोलिसांनी बजावलेल्या नोटीशीनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मेलो तरी, मागे हटणार नाही, असा पवित्रा हाती घेतला आहे. तसेच मराठा बांंधवांना शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन केलं.
मनोज जरांगे यांचं पाचव्या दिवशीही आझाद मैदानावर उपोषण सुरु आहे.आंदोलकांच्या नियम उल्लंघनानंतर पोलिसांनी मनोज जरांगे यांना नोटीस धाडत मैदाना रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांच्या नोटिशीनंतरही मनोज जरांगे यांनी उपोषण करण्याची भूमिका कायम ठेवली आहे. हैदराबाद आणि सातारा गॅझेटची अंमलबजावणी झाल्यावरच मुंबई सोडणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. जरांगे यांनी उपोषणाच्या पाचव्या दिवशी सरकारला मोठा इशारा दिला आहे. मनोज जरांगे म्हणाले, ‘ मराठ्यांना इथून काढून देणं, ही काळजात रूतणारी सल आहे. तुम्ही काहीही निमित्त काढून आझाद मैदानातून उसकवून देतात. हे तुम्हाला महागात पडेल. तुम्ही पोलिसांना सांगून अटक करायला लावाल. लाठीचार्ज करायला लावाल तर तेही तुमच्यासाठी हे अति घातक असेल. भविष्यात तुम्हाला खूप मोठा धाक असेल. तुमच्याही लोकांना महाराष्ट्रात यायचेय, असा इशारा जरांगे यांनी सरकारला दिला आहे.
‘आम्ही मुंबईत आलो म्हणून मारहाण करायला लावली. तुमच्या नेत्यांना महाराष्ट्रात यायचेय. हे लक्षात ठेवा. आम्ही आणखी शांत आहे. शांततेत मार्ग काढून मराठ्यांचा प्रश्न सोडून सन्मान करा. त्यांना पोलिसांच्या हातून अपमान करून त्यांचा अपमान करू नका. त्यांचा सन्मान केला तर हे गरीब लोकं तुम्हाला कधी विसरणार नाहीत. पण अपमान केला तर त्यांच्या डोक्यात अपमानाचा बदला घेण्याची चीड होईळ. त्यामुळे गोडीत करा, असंही जरांगे यांनी म्हटलं आहे.
‘तुम्ही ज्याच्या जिवावर बोलत आहात. त्याच्यापेक्षा आमची संख्या ही साडे नऊ पट जास्त आहे. जिकडे घुसायचे नाही, तिकडे घुसून नका. उगीच मुंबईतून हाकलून देऊ, गोरगरीबांना न्याय कसा द्यायचा ते काम करा, असेही ते म्हणाले. ‘मी मेल्या नंतरही तुम्ही शांत राहा. त्यानंतर तुम्ही काय करायचे ते करा. पण माझं म्हणणं आहे की, ही लढाई शांततेत लढायची आणि जिंकायची. देवेंद्र फडणवीस यांना ठासून सांगतोय की, फक्त कारण करू नका. कोर्टाच्या नियमाचे पोरांनी पालन करावे. न्यायदेवता आपल्यासाठी आहे, आपला आधार आहे, असा इशारा देखील जरांगे यांनी दिला.