राकेश पाचपुते यांचा आरोप, उपोषणाचा इशारा
श्रीगोंदे | नगर सह्याद्री –
Ahmednagar Breaking :सहकार महर्षी काष्टी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेत २०१५-१६ ते २०२२-२३ च्या शासकीय लेखा परिक्षण अहवालात सुमारे ३ कोटी ९१ लाख ४४ हजार २९५ रुपयांचा तत्कालीन संचालक मंडळाने आर्थिक अपहार केला. सहकार खात्याने यावर काहीच कारवाई केली नाही. यावर लवकर कारवाई झाली नाही तर सर्व संचालक मंडळ श्रीगोंदे येथे सहाय्यक निबंधक कार्यालय समोर उपोषण करणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष राकेश पाचपुते यांनी दिली.
पाचपुते म्हणाले, २२ एप्रिल २०२२ मध्ये आम्ही सत्तेवर आलो. त्यावेळी संस्थेमध्ये दहा विविध विभाग चालविले जातात यामध्ये अखेरचा शिल्लक स्टॉक हा ८ कोटी ९८ लाख २ हजार ६६१ रुपये होता. यामध्ये आम्ही सत्तेवर आल्यावर सहकार खात्या मार्फत संस्थेचे लेखापरीक्षण अहवाल केल्यावर सुरुवातीला ३ कोटी ४५ लाख ९४ हजार रुपयांची आर्थिक तुट संचालक मंडळाच्या निदर्शनास आणून दिली. त्यामध्ये मशिनरी व रासायनिक विभागामध्ये मोठ्या प्रमाणात स्टॉकमध्ये तफावत आढळून आले. त्याचप्रमाणे साडी, मशीनरी, कापड, रासायनिक विभागामधून प्रत्यक्ष विक्री झालेली असतानाही मात्र ग्राहकांना दिलेली बिले संगणकामधून डिलीट करून ३८ लाख २० हजार ६०६ रुपये अपहार झाल्याचे निदर्शनास आले. वैधानिक लेखापरीक्षक अतुल शुला याच्याकडे मागणी करत २०२१-२२ अहवालानुसार मशिनरी विभागातील विभाग प्रमुख राहुल जालिंदर पाचपुते याने ७ लाख ९९ हजार ७८० रुपये चा वयक्तिक अपहार केल्याचे सिद्ध झाले. ती रक्कम त्यांनी बारामती बँकेत संस्थेच्या खात्यामध्ये तीन टप्यात जमा केल्याचे दिसले.
यानंतर उपलेखापरिक्षक महेंद्र घोडके याच्याकडे फेरलेखापरिक्षण करत ३० दिवसात अहवाल देण्याचे सुचित केले. त्या काळात संस्थेच्या सात विभाग प्रमुख व एकवीस कर्मचारी यांनी अचानक आपल्या सेवेचे राजीनामे रजिस्टर पोस्टाने संस्थेकडे पाठविले. त्या सर्वाना आपल्या विभागाचा स्टॉक सचिवाकडे देण्याचे आदेश केले होते. ते पूर्ण केले नाही. त्यामुळे त्यांचे राजीनामे प्रलंबित आहेत.
लेखा परिक्षक घोडके यांनी ३० दिवसाची मुदत असताना सहा महिने झाले तरी अहवाल देत नसल्याने संस्थेचे संचालक काशिनाथ काळे यांनी औरंगाबाद खंडपिठात याचिका दाखल केली. त्यानंतर घोडके यांनी एक वर्षाचे लेखापरीक्षण करण्याऐवजी त्याची व्याप्ती वाढवून सहा वर्षाचे लेखापरीक्षण करावे अशी डी.डी.आर कडे विनंती केली. संस्थेच्या विविध विभागात ३ कोटी ९१ लाख ४४ हजार २९५ रुपये तूट दर्शवून तोटा झाल्याचे अहवालात नमुद केले.
सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाचे सहकार खात्यामार्फत दीपक सावंत याच्याकडून लेखापरीक्षण केल्यानंतर संस्थेत ३९ लाख २१ हजार ६४६ रुपये तोटा झाल्याने संस्थेला ऑडिट वर्ग ब देण्यात आला त्यामुळे संस्था सभासदांना लांभाश वाटप करु शकली नाही असेही ते म्हणाले. यावेळी कैलास पाचपुते, अनिल पाचपुते, ऍड.विठ्ठलराव काकडे, शहाजी भोसले, सुभाष पाचपुते, बाळासाहेब पाचपुते, काशिनाथ काळे, पोपट पाचपुते, दादा कोकाटे, रोहिदास सोनवणे, लक्ष्मण पाचपुते आदी उपस्थित होते.