अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
शासनाकडून महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला 15 व्या वित्त आयोगाद्वारे प्राप्त झालेल्या निधीतून 16 लाख 50 हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी राष्ट्रीय आरोग्य अभियानचे शहर लेखा व्यवस्थापक विजयकुमार महादेव रणदिवे व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांच्यावर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महानगरपालिकेने दिलेल्या तक्रार अर्जाच्या चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही अटक करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी सांगितले.
आरोग्य विभागाचे प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजुरकर यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी आरोग्य विभागाच्या संपूर्ण कामकाजाच्या चौकशीचे आदेश दिले होते उपायुक्त विजयकुमार मुंडे मुख्यालय एका परीक्षक विशाल पवार व प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर राजुरकर यांच्या समितीने चौकशी करून आयुक्तांकडे अहवाल सादर केला होता यात शासकीय अभियानाच्या खात्यातून 15 लाख व 16 लाख 50 हजार रुपये रणदिवे यांच्या खात्यात वर्ग झाल्याचे आढळून आले तसेच पंधरा लाख रुपये टप्प्याटप्प्याने पुन्हा अभियानाच्या खात्यात वर्ग झाल्याचे आढळून आले मात्र 16 लाख 50 हजार रुपये अद्यापही खात्यात जमा झालेले नसल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले होते.
त्यानुसार महानगरपालिकेने कोतवाली पोलिसांकडे तक्रार अर्ज सादर केला होता या अर्जाची बुधवारी सकाळपासून चौकशी सुरू होती. चौकशीनंतर डॉ. राजुरकर यांनी फिर्याद दिली. रणदिवे यांनी त्यांच्या पदाचा व अधिकाराचा वापर करुन 15 व्या वित्त आयोगाकाढून आलेला निधीतील स्टेट बैंक ऑफ इंडीयाच्या खात्यातून ऑनलाईन प्रक्रीयेद्वारे 16 लाख 50 हजार रुपये डॉ. अनिल बोरगे यांची मंजुरी घेऊन संगमताने कॅनरा बँकेच्या वैयक्तीक बँक खात्यात वर्ग केले. त्या निधीचा स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणी डॉ. बोरगे व रणदिवे यांची सकाळपासून चौकशी सुरू होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे, असे निरीक्षक प्रताप दराडे यांनी सांगितले.