अहिल्यानगर । नगर सहयाद्री
महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात 15 व्या वित्त आयोगाच्या रकमेत झालेल्या अपहारप्रकरणी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना निलंबित करण्यात आल्यानंतर आता राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान कार्यालयाकडून शहर लेखा व्यवस्थापक विजयकुमार रणदिवेची नियुक्ती रद्द करून त्याला बडतर्फ केले आहे. अभियानाच्या सहाय्यक संचालक डॉ. दिप्ती देशमुख यांनी हे आदेश काढले आहेत.
आरोग्य विभागाच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी आयुक्त यशवंत डांगे यांनी त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली. या चौकशीत 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून 15 लाख रुपये शहर लेखा व्यवस्थापक विजयकुमार रणदिवे यांच्या वैयक्तिक खात्यात वर्ग केले. ते पुन्हा प्रत्येकी पाच लाख रुपयांप्रमामे निधी खात्यात वर्ग केले. तसेच त्यानंतर 16 लाख 50 हजार रणदिवे यांच्या खात्यात वर्ग केले. ते अद्याप खात्यात जमा केलेले नाहीत. त्यामुळे महापालिकेने कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी डॉ. बोरगे व रणदिवे यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करण्यात आली होती.
48 तासांपेक्षा अधिक कालावधीसाठी पोलिस कोठडीत असल्याने आयुक्त डांगे यांनी डॉ. बोरगे यांना निलंबित केले. तसेच, रणदिवेबाबत राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालयाकडे अहवाल दिला होता. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत एखाद्या कंत्राटी कर्मचाऱ्याविरुद्ध फसवणुकीचा किंवा फौजदारी गुन्हा दाखल झाल्यास, तसेच दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने किमान 48 तास तुरुंगात राहिल्यास अश्या कर्मचाऱ्याची नियुक्ती संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांनी तत्काळ संपुष्टात आणावी, अशी तरतूद आहे. त्या नुसार अपहार प्रकरणी दोषी आढळून आल्याने फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला व 48 तासापेक्षा जास्त पोलिस कोठडी दिली असल्याने 12 फेब्रुवारी पासून राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत महानगरपालिकेत शहर लेखा व्यवस्थापक या पदावरील रणदिवे याची सेवा समाप्त करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.