पारनेर । नगर सहयाद्री :-
पारनेर नगरपंचायतीच्या तराळवाडी कचरा डेपोमध्ये सोलर प्रकल्प उभारण्यासाठी ९ ते १० लाख रुपयांचा खर्च दाखवून बिल अदा करण्यात आले असतानाही प्रत्यक्षात प्रकल्प अस्तित्वातच नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवक अशोक चेडे आणि नगरसेविका नीता ठुबे यांनी नगराध्यक्ष नितीन अडसूळ यांच्यावर गंभीर आरोप करत सखोल चौकशीची मागणी केली आहे.
या प्रकरणी दोन्ही नगरसेवकांनी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया तसेच नगरपंचायत अधीक्षक शंकर गोरे यांच्याकडे निवेदन दिले असून, या निवेदनावर नगरसेविका शालुबाई ठाणगे व तुषार औटी यांचीही स्वाक्षरी आहे.
सोलर प्रकल्प कुठे?
नगरपंचायतीने लाखो रुपयांचा खर्च दाखवला असला तरी, कचरा डेपो परिसरात सोलर पॅनल किंवा कोणतीही सोलर यंत्रणा दिसून येत नाही, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. “जर सोलर प्लेट्स लावण्यात आल्या असतील आणि त्या चोरीला गेल्या असतील, तर गुन्हा दाखल का केला नाही?” असा सवाल चेडे व ठुबे यांनी उपस्थित केला आहे.
निकृष्ट कामांची मालिका
फक्त सोलरच नव्हे, तर कचरा डेपोतील रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाली असून, सध्या सुरू असलेले पाण्याच्या टाकीचे काम सुरुवातीलाच फुगलेले दिसत आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. लेबर रूमसह इतर बांधकामे देखील निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप करत त्यांनी लवकरच उपोषणाचा इशाराही दिला आहे.
विरोधी नगरसेवकांचे आरोप निराधार
तराळवाडी कचरा डेपोमध्ये १५ किलोवॅटचा सोलर प्रकल्प कार्यरत आहे. यामुळे नगरपंचायतीला महावितरणकडून ‘झिरो बिल’ येत असून, याचे बिल आमच्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळे विरोधी नगरसेवकांचे आरोप निराधार व चुकीचे आहेत. तसेच महावितरणकडे १८०० युनिट वीज वर्ग करण्यात आली आहे. लवकरच ३४ लाख रुपये खर्चून कचरा निर्मूलन खत प्रकल्प या सोलर यंत्रणेवर कार्यान्वित केला जाणार आहे.
नितीन आडसूळ, नगराध्यक्ष, पारनेर