मुंबई \ नगर सहयाद्री:-
राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याचे संकेत मिळत असून, प्रशासन व राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १५ ते २० नोव्हेंबरदरम्यान नगरपरिषद निवडणुका, तर १५ ते २० डिसेंबरदरम्यान जिल्हा परिषद निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याचबरोबर, राज्यातील सर्व महानगरपालिका निवडणुका पुढील वर्षी १५ जानेवारीला एकाच दिवशी घेण्यात येतील, अशी शक्यता आहे. यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबादसह अन्य महत्त्वाच्या महापालिकांचा समावेश आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आपापल्या स्तरावर तयारी सुरू केली आहे.
भाजपने आधीच स्पष्ट केले आहे की, या निवडणुका ‘महायुती’ म्हणूनच लढवल्या जातील. मात्र, शिवसेना (शिंदे गट) मंत्री गुलाबराव पाटील यांनी काहीसे वेगळे संकेत देताना, भाजप महायुतीत लढण्याचं सांगत असलं तरी अंतर्गत पातळीवर स्वबळाची चर्चा सुरू आहे, असे वक्तव्य केले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडूनही काही नेत्यांनी स्वबळाचे संकेत दिले आहेत, त्यामुळे या निवडणुकांमध्ये युती होणार की पक्ष स्वतंत्रपणे लढतील, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
रविवारी शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान ‘मातोश्री’ येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट दिल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांमध्ये अर्ध्या तासाच्या चर्चेनंतर, मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे गट आणि मनसे युती होणार का, याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नेहमीच जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय असतात. त्यामुळे येत्या काळात राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे.