अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 पालिकांसाठी हालचाली
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
जिल्ह्यातील 12 पालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा बिगुल वाजला असून सोमवारपासून (दि. 10) उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. उमेदवारांना सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेत अर्ज दाखल करता येणार आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका प्रशासनाने तयारीवर भर दिला आहे. दरम्यान, पालिका निवडणुकीसाठी राज्य अथवा जिल्हा पातळीवरून महायुती अथवा महाविकास आघाडीबाबत कोणतीच घोषणा नसल्याने सर्व पक्षाकडून जवळपास स्व-बळावर निवडणुकांची तयारी सुरू करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.
राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी (दि. 4) राज्यातील 246 नगरपालिका व 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला. त्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता, शिड, देवळाली प्रवरा, राहुरी, शेवगाव, पाथड, श्रीगोंदा, जामखेड या नगरपलिका व एक नेवासा नगरपंचायतचा समावेश आहे. आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमामध्ये नामनिर्देशन अर्ज हे 10 ते 17 नोव्हेंबर या कालावधीत भरण्याची मुदत दिली आहे.अर्ज स्वीकारण्यासाठी सकाळी 11 ते दुपारी 3 हा कालावधी निश्चित केला आहे.
जिल्ह्यात 12 पालिकांच्या कार्यक्षेत्रात निवडणूक निर्णय अधिकारी उमेदवारांचे अर्ज स्वीकारणार आहे. यंदा पहिल्यांदा सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांची दोन पदे नियुक्त करण्यात आल्या. नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची प्रक्रिया 10 ते 17 नोव्हेंबर या कालावधीत होणार असून रविवार व सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशन स्वीकारले जाणार नाहीत. नामनिर्देशन स्वीकारण्याची वेळ सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 अशी राहील. प्राप्त अर्जांची छाननी 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येईल. वैध अर्जदारांची यादी याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल.
उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत 19 ते 21 नोव्हेंबर दुपारी 3.00 वाजेपर्यंत राहील. माघारीनंतर उमेदवारांना 26 नोव्हेंबर रोजी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. मतदान 2 डिसेंबर रोजी असून मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 अशी राहील. त्यानंतर 3 डिसेंबर रोजी सकाळी 10.00 वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया होणार आहे. उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावा लागणार आहे. सर्वसाधारण व ओबीसी उमेदवारांसाठी अर्ज फी 1 हजार रुपये तर अनुसूचित जाती उमेदवारांसाठी 500 रुपये इतकी अनामत रक्कम निश्चित करण्यात आली आहे.
नगराध्यक्षाची थेट जनतेतून निवड
होणार असल्याचे काटे की टक्कर…
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा पहिला टप्पा सुरु झाला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात 12 ठिकाणी निवडणूका होत आहेत. नगराध्यक्षपद थेट जनतेतून निवडला जाणार असल्याने सर्वच ठिकाणी काटे की टक्कर पहावयास मिळत आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असली तरी स्थानिक पातळीवर आघाडी आणि युतीचे गुऱ्हाळ सुरुच असून अजून काही दिवस असेच चर्चेचे गुन्हाळ सुरु राहील. शेवटच्या टप्प्यात आघाडी व युतीवर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.



