सारीपाट / शिवाजी शिर्के –
बारामती मुक्कामी शरद पवार यांनी संसदीय राजकारणातून निवृत्त होण्याची पुन्हा घोषणा केली. दीड वर्षापूर्वी म्हणजेच २ मे २०२३ रोजी पवारांनी हीच घोषणा केली होती. मात्र, त्यावेळी त्यांचा हा निर्णय अजित पवार वगळता कोणीही स्वीकारला नाही. खुटा बळकट करून घेण्याचे काम त्यांनी केले. पुढे अजित पवारांचं बंड झालं! पवारांनी घर फोडल्याचा मुद्दा मतदारांसमोर नेला आणि लोकसभेचा स्टाईक रेट वाढला. आता देखील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पवारांनी निवृत्तीचे संकेत दिलेत! मात्र, राजकारणातून बाहेर जातील ते पवार कसले! लोकसभेत दहापैकी आठ खासदार निवडून आणणार्या शरद पवार यांना आता विधानसभेत अजित पवार यांच्यापेक्षा जास्त आमदार निवडून आणायचे आहेत आणि त्यासाठीच त्यांनी निवृत्तीच्या घोषणेचा डाव टाकल्याचे मानले जाते.
बारामती मुक्कामी असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दीड वर्षानंतर पुन्हा एकदा राजकारणातून निवृत्तीचे सूतोवाच केले. गेली ५०-५५ वर्षे मी राजकारणात आहे. १४ निवडणुका लढल्या, बारामतीकरांनी एकदाही मला घरी पाठवलं नाही. तुमच्या सर्वांमुळे मी मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री झालो. आता मी राज्यसभेत आहे. अजून दीड वर्ष टर्म आहे. त्यानंतर पुन्हा राज्यसभेत जायचं की नाही याचा विचार करावा लागेल. यापुढे मी कोणतीच निवडणूक लढवणार नाही. आता कुठेतरी थांबलं पाहिजे, नव्या पिढीला समोर आणलं पाहिजे, हे सूत्र घेऊन मी कामाला लागलोय, अशी भूमिका पवारांनी मंगळवारी बारामतीच्या सभेत मांडली. मी ३० वर्षे बारामतीचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर इथली जबाबदारी अजित पवारांकडे दिली. २५-३० वर्षे त्यांनीही कारभार पाहिला. आता पुढच्या ३० वर्षांची व्यवस्था करण्याची गरज आहे. त्यामुळे युगेंद्र पवारांच्या हाती सूत्रे सोपवत आहे, असे सांगून पवारांनी बारामतीतून अजित यांना घरी बसवण्याचेच अप्रत्यक्ष आवाहन केल्याचे जाणकारांकडून मानले जाते.
शरद पवारांनी लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागण्याआधी म्हणजेच दि. २ मे २०२३ रोजी राजकीय निवृत्तीची घोषणा केली होती. पण त्या वेळी समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर विरोध केल्यामुळेे तिसर्याच दिवशी म्हणजेच अवघ्या ७२ तासांतच त्यांनी आपला निर्णय मागे घेतला होता. अजित पवार यांनी मात्र त्या वेळी पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयाचे समर्थन केले होते. साहेबांनी आता थांबून दुसर्या पिढीकडे जबाबदारी सोपवली पाहिजे अशी अपेक्षा अजित पवार यांनी त्यावेळी व्यक्त केली होती. मात्र पक्षातल्या इतर नेत्यांना ते मान्य नव्हते. त्यामुळे नवीन नेतृत्वाची सर्वानुमते निवड होईपर्यंत मीच अध्यक्ष राहीन, असे शरद पवारांनी जाहीर केले. नंतर त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळेंना पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षा म्हणून निवडण्यात आले होते. शरद पवार पक्षाचे नेतृत्व सोडत नसल्यामुळे अखेर अजित पवार यांनी २ जुलै २०२३ रोजी राष्ट्रवादीत फूट पाडून ४० आमदारांचा वेगळा गट तयार केला होता. भाजपशी हातमिळवणी करत स्वतः उपमुख्यमंत्रिपद मिळवले तसेच इतर ८ प्रमुख नेत्यांनाही मंत्रिपद मिळवून दिले होते. शरद पवारांसाठी हा मोठा धक्का होता.
दीड वर्षापूर्वी पक्ष फुटला तरी खचून न जाता शरद पवारांनी ८३ व्या वर्षीही पायाला भिंगरी लावून महाराष्ट्र पिंजून काढला. पक्षाची नव्याने बांधणी केली. इतर पक्षांतील बडे नेते आणले. लोकसभा निवडणुकीत त्यांनी ८० टक्के स्ट्राईक रेट मिळवत अजूनही आपल्यात संघटनकौशल्य असल्याचे दाखवून दिले. अजित पवारांनी घर फोडल्याचे सांगत बारामतीकरांची सहानुभूती मिळवली व सुनेला हरवून मुलगी सुप्रियांना निवडून आणले. आता विधानसभेतही त्यांचा हाच पॅटर्न आहे. या वेळी नवख्या युगेंद्रला अजितविरोधात विजयी करण्यासाठी व बारामतीकरांची सहानूभूती मिळवण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा निवृत्तीचे संकेत दिल्याचे मानले जाते.
शरद पवार यांनी जेव्हा जेव्हा सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा आघाडीला फायदा झाला. सन २०१९ मध्ये आघाडीला प्रतिकूल वातावरण असतानाही सातार्याच्या सभेत पवार भिजले अन् दोन्ही काँग्रेसला त्याचा लाभ झाला. २०२३ मध्ये पक्षफुटीनंतर पवारांनी माझे घर फोडले, म्हणत सहानुभूती मिळवली. त्यामुळे लोकसभेत त्यांचे १० पैकी ८ खासदार विजयी. आता विधानसभेला अजित पवारांपेक्षा जास्त आमदार निवडून आणण्याचा प्रयत्न असणार असल्याचे लपून राहिलेले नाही.
आता प्रचारसभांचा धुरळा उडायला सुरुवात झालीय. सत्ताधारी लाडया बहिणीला खुश करण्यासाठी ओवाळणी वाढवण्याची आमिषे दाखवू लागले, तर दीड हजार रुपयांत काय होतंय.. म्हणून विरोधक हेटाळणी करताहेत. आजवर अशा घोषणांना भूलथापा म्हणणार्या वंचित आघाडीलाही आपल्या जाहीरनाम्यात बहिणींना तीन हजारांची मदत देण्याबाबतची घोषणा करण्याचा मोह आवरता आलेला नाही. इकडे, पवार काकांनी पुतण्याला धूळ चारण्यासाठी पुन्हा एकदा निवृत्तीचे सहानुभूती अस्त्र बाहेर काढले. ते खरंच निवृत्ती घेतात की पुतण्याला घरी बसवून नातवांना नवी इनिंग सुरू करून देतात, याकडे महाराष्ट्राचे लक्ष आहे.