अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
नगर अर्बन बँकेतील सुमारे 291 कोटी रूपयांच्या घोटाळ्याची प्राथमिक चौकशी आता सक्तवसुली संचालनालय (इडी) कडून सुरु झाली आहे. यामुळे आता अनेकांचे धाबे दणाणले आहेत. बँकेतील घोटाळ्या प्रकरणाचा तपास येथील आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू असून या प्रकरणात आता इडीफने हस्तक्षेप करत बँकेकडून सर्व महत्त्वाची कागदपत्रे मागवली आहेत. 8 जुलै रोजी बँकेच्या अधिकाऱ्यांनी इडी कार्यालयात हजर राहून माहिती सादर केली आहे. बँकेने किती कर्जदारांकडून वसुली केली, किती कर्जदारांनी पैसे फेडण्यास नकार दिला, याची माहिती गोळा केली जात आहे. यासोबतच काही संशयितांना लवकरच इडी समन्स पाठवू शकते, असे सूत्रांनी सांगितले.
नगर अर्बन बँकेतील हा घोटाळा 2014 ते 2019 या कालावधीत घडला. माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. फिर्यादीत नमूद करण्यात आले होते की, त्या काळातील चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक व बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपूर्ण संचालक मंडळाच्या बैठका घेऊन कर्जप्रकरणे मंजूर केली. या कर्जप्रकरणांमध्ये काही कर्जदारांशी संगनमत करून बनावट व्हॅल्युएशन रिपोर्ट, खोटे आर्थिक पत्रके व फसवे दस्तऐवज तयार करण्यात आले. या माध्यमातून बँकेचे आणि ठेवीदारांचे 100 ते 150 कोटींचे नुकसान झाले.
या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केल्यानंतर, सखोल चौकशीसाठी फॉरेन्सिक ऑडिट करण्यात आले. या ऑडिट रिपोर्टमध्ये एकूण अपहाराची रक्कम 291.25 कोटी रूपये असल्याचे स्पष्ट झाले. या गुन्ह्यात आतापर्यंत 17 जणांना अटक करण्यात आली. आता बँक घोटाळ्याच्या तपासात इडीच्या सहभागामुळे ठेवीदारांमध्ये नव्याने आशा निर्माण झाली आहे. इडी सारखी केंद्रीय संस्था या प्रकरणात सक्रिय झाली असल्यामुळे कर्जदारांकडून वसुली होण्याची शक्यता ठेवीदार व्यक्त करत आहेत. आगामी काळात इडीच्या तपासातून काय निष्पन्न होते याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे.