सोलापूर / नगर सह्याद्री –
माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. मात्र, दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार अडचणीत आले आहेत. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेनी माध्यमांना जाहीरपणे माहिती देताना सांगितले की, दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. शिवसेनेने गडबड केली आणि दक्षिण सोलापूर मतदारसंघ स्वतःकडे ठेवला. दक्षिण सोलापूर मतदारसंघात काँग्रेसकडून अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा देण्यात आला असल्याची माहिती काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेनी स्पष्टपणे सांगितले आहे. उद्धव ठाकरेंचे उमेदवार अमर पाटील हे मतदानाच्या दिवशीच अडचणीत आले आहेत.
दक्षिण सोलापूर मतदार संघातून माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. ”दक्षिण सोलापूर मतदारसंघ काँग्रेसने महाविकास आघाडीच्या बैठकीत मागितला होता. परंतु शिवसेनेने गडबड केली आणि हा मतदार संघ स्वतःकडे ठेवला. अमर पाटील हे शिवसेनेकडून (उबाठा) निवडणूक लढवत आहेत. अमर पाटील यांचे वडील रातीकांत पाटील हे शिवसेनेचे आमदार म्हणून दक्षिण सोलापूर मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आले होते”. सुशीलकुमार शिंदे यांनी पुढे बोलताना सांगितले की, ”आम्ही महाविकास आघाडीच्या बैठकीत हे सगळं निदर्शनास आणून दिलं आहे. त्यामुळे आम्ही अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा देत असल्याचे जाहीरपणे सांगितलं आहे”.
महाविकास आघाडीचा धर्म विसरून अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदें यांनी महाविकास आघाडीचा धर्म विसरून अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिला आहे. २० नोव्हेंबर रोजी सकाळी नेहरू नगर येथील मतदान केंद्रावर सुशीलकुमार शिंदे आणि खा.प्रणिती शिंदें बरोबर अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी उपस्थित होते. अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्याने शिवसेना उबाठा गटाला जबर धक्का बसला आहे.
उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं…
उद्धव ठाकरे यांची दक्षिण सोलापुरात सभा झाली होती. अमर पाटील यांच्या प्रचाराला उद्धव ठाकरे सोलापुरात आले होते. भाषण करताना उद्धव ठाकरेंनी खा.प्रणिती शिंदे यांचे कान टोचले होते. प्रणिती शिंदेंना आवाहन केले होते. ”मी तुझ्या प्रचाराला आलो होतो. आमच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली होती”. त्यामुळे दक्षिण सोलापूरमध्ये प्रचाराला येण्याचे आवाहन केले होते. परंतु खा.प्रणिती शिंदे आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे दक्षिण सोलापुरात एकदाही शिवसेना उमेदवाराच्या प्रचारात दिसले नाहीत. मतदान करून बाहेर आल्यानंतर जाहीरपणे सांगितले आणि अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिला.