पुणे । नगर सहयाद्री:-
विधानसभा निवडणुकीत सत्ता बदल झाल्यानंतर कधी युती तर कधी आघाडीची सत्ता आली. यामध्ये सत्तेत सहभागी होणाऱ्या आमदारांना वळवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यानंतर अनेकदा अशा प्रकारचे प्रयत्न चालू असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षातील खासदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे. तसा फोन राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला असल्याचे सांगण्यात येत आहे.
यामुळे आता संपर्क साधण्यात आलेले खासदार राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात जाणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. संपर्क साधण्यात आलेल्या 7 खासदारांनी ही ॲाफर नाकरल्याचे सांगण्यात येत आहे. यावर शरद पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रफुल्ल पटेल यांना फोन करत सुनील तटकरे यांच्या बाबतीत नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळत आहे.
यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शरद पवार यांच्या पक्षातील सुप्रिया सुळे सोडून इतर 7 खासदारांना तटकरे स्वतंत्रपणे भेटून त्यांना पक्षात येण्याची मोठी ॲाफर दिली आहे. तसेच यावर कोठेही काही बोलू नका असे खासदारांना सांगण्यात आले आहे. ही गोष्ट खासदारांनी सुप्रिया सुळे यांना सांगितली आहे. केंद्र सरकारला अधिक स्थिरता मिळावी यासाठी या 7 खासदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
खासदारांनी ऑफर धुडकावली
राज्यात गेल्या महिन्यांपूव विधानसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या कामगिरी फारशी चांगली ठरली नाही. तर महायुतीने राज्यात पुन्हा सत्ता आणत 235 जागांवर विजय मिळवला. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची चांगली कामगिरी राहिले. 8 खासदार लोकसभा निवडणुकीत निवडून आले. मात्र, विधानसभा निवडणुकीत या पक्षाचा परफॉमर्न्स ढासाळला आणि 86 उमेदवारांपैकी केवळ 8 खासदार या पक्षाने निवडून आणले. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. 7 लोकसभा खासदारांना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात येण्याबाबत विचारणा करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. पण खासदारांनी ही ॲाफर धुडकावली असल्याची देखील माहिती मिळत आहे.
शरद पवारांचे खासदार जोपर्यंत फुटत नाही तोपर्यंत अजित पवारांच्या गटाला केंद्रात मंत्रिपद नाही ; संजय राऊतांचं मोठं विधान
राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील खासदारांना संपर्क साधून आपल्याकडे वळविण्याच्या बातमी काही वेळापूर्वीच आली. यानंतर राज्याच्या राजकारणात चर्चांन उधान आले आहे. यावर आता शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. शरद पवारांच्या पक्षाचे खासदार फुटत नाहीत, तोपर्यंत अजित पवारांच्या गटाला केंद्रात मंत्रीपद मिळणार नाही. हे मंत्रीपद प्रफुल्ल पटेल यांना हवं आहे, असा दावा करीत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना केंद्रात मंत्रीपद हवं असल्याचे ते म्हणाले. तसेच राऊत यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर बोचरी टीका केली आहे. निवडणूक आयोग सरकारच्या ताटाखालचे मांजर झाले असल्याचे राऊत म्हणाले.
देशाला त्याचा काहीही उपयोग नाही
शरद पवारांच्या पक्षाचे खासदार फुटत नाहीत तोपर्यंत अजित पवारांच्या गटाला केंद्रात मंत्रिपद मिळणार नाही. हे मंत्रिपद प्रफुल्ल पटेल यांना हवं आहे. पटेल यांना सांगितलं गेलं आहे की खासदारांचा कोटा पूर्ण करा. शरद पवारांच्या गटाचे सहा ते सात खासदार फोडले की तुम्हाला मंत्रिपद मिळेल. देशाला त्याचा काहीही उपयोग नाही. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना केंद्रात मंत्री व्हायचं आहे. त्यामुळे फोडाफोडीचा नीच आणि निर्ल्लज प्रकार सुरु असल्याची घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली. तसेच ईव्हीएमच्या माध्यमातून महाराष्ट्र विधानसभा तुम्ही जिंकला आहात तरीही तुमची फोडाफोडीची भूक भागत नाही. कार्यकर्ते, आमदार, खासदार फोडाफोडी सुरु आहे. देशाचं भाग्य तुम्ही काळ्या शाईने लिहिणं चालवलं आहे, अशा शिलक्या शब्दांत त्यांनी टीका केली.