अहिल्यानगर | नगर सह्याद्री
टेलिग्रामद्वारे गुंतवणुकीवर जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एकाची साडेदहा लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. ९ ते ११ डिसेंबर दरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी प्रकाश कुमार घुरण कश्यप (हल्ली रा. कुकाणा, नेवासा, मूळ रा. मधुबनी, बिहार) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
९ डिसेंबर ते ११ डिसेंबर दरम्यान प्रकाश कुमार यांना ऐश्वर्या व क्रिस्ता या दोन टेलिग्राम आयडी धारकांकडून गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून आर्थिक व्यवहार करण्यास भाग पाडले. त्यांच्याकडून साडेदहा लाख रुपये घेऊन ते परत न करता, त्यांची फसवणूक केली. सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलिस निरीक्षक संतोष खेडकर हे करत आहेत.
दरम्यान, ऑनलाईन गुंतवणूक करून फसवणूक होण्याच्या घटना वारंवार घडत असतानाही नागरिकांकडून कोणतीही खातरजमा न करता अमिषाला बळी पडून लाखो रुपयांची गुंतवणूक केली जात आहे. नागरिकांनी खात्री केल्याशिवाय अशाप्रकारे गुंतवणूक करू नये, आर्थिक व्यवहार करताना दक्षता घ्यावी, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.