श्रीगोंदा । नगर सहयाद्री:-
गेल्या दोन-तीन दिवसापासून श्रीगोंदा तालुक्यात ढगाळमय वातावरण निर्माण होत असल्याने वातावरणात देखील गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे या वातावरणातील बदलामुळे आरोग्यसह खरिपाच्या उभ्या पिकांवर मोठा दुष्परिणाम झाला असून खरिप हंगामातील पिके धोक्यात आली आहे. त्यातच आणखी दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने मिळणाऱ्या उत्पन्नाबाबत देखील मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
चालू वर्षी पावसाळा सुरू झाल्यापासून पाऊस दररोज हजेरी लावताना दिसत आहे. त्यामुळे सद्यस्थितीला खरीप हंगामाला हे वातावरण पोषक नसल्याचे शेतकरी सांगतात. त्यामध्ये गेल्या आठ दिवसापासून ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शन होताना दिसत नाही. त्यामुळे खरिपाची हातातोंडाशी आलेले पिके या अतिवृष्टीमुळे भुईसपाट होतात की काय? अशी शंका देखील शेतकऱ्यांमधून व्यक्त केले जात आहे.
पावसाने चालू वर्षी वेळेत पावसामुळे खरिपातील पिके जोमात होती. परंतु सततच्या पावसाने काटनीला आलेली बाजरी अक्षरशा भोईसपाट झाल्याचे दिसून येत आहे. तर कपाशीची पाने पिवळी पडले आहेत. कपाशीच्या पाकळ्या ही गळून जाताना दिसत आहेत. त्यामुळे चालू वर्षी जोमात आलेल्या या खरिपाच्या पिकातून भरघोस उत्पन्न मिळण्याची घोर निराशा शेतकऱ्यांना होताना दिसत आहे.
नुकसानीचे पंचनामे करण्यास टाळाटाळ
राज्य सरकारच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांकडून खरिपाच्या पिकांचे एक रुपया प्रमाणे पिक विमे भरून घेतले. मात्र आता नुकसानीचे पंचनामे करण्यास अधिकारी टाळाटाळ करत आहे. कृषी विभागाकडून पंतप्रधान कृषी विमा फ्री टोल क्रमांक १४ ४४७ या क्रमांकाशी संपर्क साधण्याचे शेतकऱ्यांना सांगत असल्याची चर्चा असून शेतकऱ्यांनी पंतप्रधान कृषी विमा कार्यालयाशी संपर्क साधला असता या सर्व लाईन्स व्यस्त असल्याचे शेतकऱ्यांकडून समजते. त्यामध्ये काही शेतकऱ्यांचे फोन उचलले जातात व त्यांच्याकडून राज्य जिल्हा व तालुका आणि गाव इत्यादींची माहिती घेतली जात आहे. परंतु पुढे या नुकसानीची कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे.