Maharashtra Crime News: चाळीसगाव-कन्नड मार्गावर कन्नड घाटाच्या पायथ्याशी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत तब्बल ६० कोटी रुपये किमतीचा एमडी ड्रग्स जप्त करण्यात आला आहे. दिल्लीहून छत्रपती संभाजीनगरकडे नशेचा साठा घेऊन जाणाऱ्या वाहनावर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, दिल्लीहून एक वाहन मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ घेऊन छत्रपती संभाजीनगरकडे जात असल्याचे समजले. त्या माहितीच्या आधारे चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी कन्नड घाटाच्या पायथ्याशी सापळा रचून संशयित वाहन थांबवले.
तपासणीदरम्यान त्या वाहनामध्ये एमडी ड्रग्सचा मोठा साठा सापडला. प्राथमिक चौकशीत वाहन चालकाने वाहनामध्ये कोटींच्या घरात एमडी ड्रग्स असल्याची कबुली दिली. तत्काळ वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वेगाने सुरू आहे.
हा जिल्ह्यातील आतापर्यंतचा सर्वात मोठा अमली पदार्थ जप्तीचा प्रकार मानला जात असून, या कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात तसेच राज्यभरात खळबळ उडाली आहे.