मुंबई । नगर । सहयाद्री:-
देशभरात सध्या हवामानामध्ये सतत बदल होत असून, तापमानाचा अंदाज लावणे कठीण झाले आहे. एकीकडे सूर्य आग ओकत आहे, तर दुसरीकडे काही भागांमध्ये अचानक पावसाने हजेरी लावली आहे. या बदलत्या परिस्थितीमुळे नागरिक संभ्रमात आहेत, आणि आरोग्याच्या अनेक समस्यांमध्ये वाढ झाली आहे.
गेल्या 24 तासांत राजस्थान, मध्य प्रदेश आणि दिल्लीमध्ये अचानक पावसाची नोंद झाली, ज्यामुळे तापमानात काही प्रमाणात घट झाली. तथापि, हवामान विभागाने स्पष्ट केले आहे की, हा दिलासा तात्पुरता आहे, आणि ओडिशा, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये 14 ते 18 मार्च दरम्यान तापमान पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात उष्णतेची तीव्रता वाढत असून, विशेषतः विदर्भ क्षेत्रात ती अधिक जाणवते. ब्रह्मपुरीत तापमान 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे, तर चंद्रपूर, अकोला, नागपूर आणि वर्धामध्ये तापमान आणखी 1 ते 2 अंशांनी वाढण्याचा इशारा दिला आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये उष्णतेची लाट जाणवत आहे, आणि नागरिकांना भर उन्हात बाहेर न पडण्याचा सल्ला दिला जात आहे. उत्तर महाराष्ट्रात पहाटेच्या वेळी गारवा जाणवत असला, तरी दिवसा तापमानाचा स्तर चांगलाच वाढत आहे.
दक्षिण भारताच्या किनारपट्टीवर उष्णतेची लाट कायम आहे. तामिळनाडूच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. उत्तर भारतात हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पाऊस आणि हिमवृष्टीसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत.या बदलत्या हवामानाच्या परिस्थितीमुळे नागरिकांना योग्य खबरदारी घेण्याचे आणि आरोग्याच्या दृष्टीने सजग राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.