अहिल्यानगर । नगर सह्याद्री
अहिल्यानगर जिल्ह्यातील खरीप पिकांना गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या रिमझिम पावसामुळे नवसंजीवनी मिळाली आहे. पावसाअभावी कोमेजलेल्या आणि सुकत चाललेल्या पिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला असून, जमिनीला आवश्यक तेवढा ओलावा मिळाल्याने शेतकर्यांच्या चेहर्यावर आनंद फुलला आहे. यावर्षी मान्सूनने सुरुवातीलाच हजेरी लावल्याने पेरणी झालेली मका, सोयाबीन, तूर, बाजरी, उडीद यांसारखी पिके पाण्याअभावी सुकू लागली होती. अनेक शेतकर्यांनी महागड्या बियाणे व खते वापरून पेरण्या केल्या होत्या, मात्र पावसाने दडी मारल्याने चिंतेचे वातावरण होते.
फुलगळती आणि पिकांच्या मरगळलेल्या स्थितीमुळे उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता होती. मात्र गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे पिकांची वाढ पुन्हा जोमाने सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जमिनीतील ओलावा वाढल्याने शेतीतील खुरपणी, कुळपणी, आंतरमशागत कामाला वेग मिळाला आहे. त्यामुळे शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे. पावसामुळे केवळ पिकांना नवजीवन मिळाले नाही, तर शेतकर्यांच्या मानसिकतेलाही दिलासा मिळाला आहे. यामुळे उत्पादन वाढण्याची शययता असून, खरीप हंगाम यशस्वी होईल अशी आशा शेतकर्यांना वाटत आहे.
अहिल्यानगरमध्ये 30 जुलैपर्यंत पाऊस
राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून अनेक भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. तसेच गेल्या दोन दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस हजेरी लावत आहे. तसेच हवामान खात्याने 30 जुलैपर्यंत अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचा इशारा दिला आहे. नगर तालुक्यात शनिवारी सकाळपासून रिपरिप सुरु झाली आहे.
विदर्भात पावसाचे थैमान
नागपूरसह संपूर्ण पूर्व विदर्भात मध्यरात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे उपराजधानीतील अनेक सखल भागांत पाणी साचले आहे. दुसरीकडे, अरावती जिल्ह्यात मेघा नदीला पूर आला असून, वर्ध्यातही पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे काही ठिकाणी शेतकर्यांना दिलासा मिळाला असला, तरी शहरी भागांत मात्र जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.